Pune Crime News | पुण्यात IT क्षेत्रात नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक; रेडीयंट एडटेक एल.एल.पी. चे सैफ वाहिद मनियार व इतर संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | आयटी कंपन्यांमध्ये कायमस्वरूपी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. खराडी येथील रेडीयंट एडटेक एल.एल.पी. आणि रेडीयंट आयटी सर्व्हिसेस या कंपन्यांच्या व्यवस्थापनाविरोधात खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, रेडीयंट एडटेक एल.एल.पी. चे मालक सैफ वाहिद मनियार Saif Waheed Maniyar (वय-३१ रा-ऊरूळीकांचन, तुपे वस्ती), एक्झीकेटीव्ह मॅनेजर सुमित सुराना, फायनान्स मॅनेजर वैभव दुबेवार, गितेश गजानन कुंबलकर Gitesh Gajanan Kumbalkar (वय-२५ रा- रावेत, पुणे) व इतर संचालकांनी आयटी क्षेत्रात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत अनेक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात नोंदणी शुल्क घेतल्याचा आरोप आहे.
आरोपींनी बेरोजगार तरुणांना नामांकित आयटी कंपन्यांमध्ये स्थिर आणि उच्च पगाराच्या नोकऱ्या मिळवून देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी काही उमेदवारांना कंपनीतच कामावर घेतले गेले आणि काही महिन्यांपर्यंत पगारही दिला गेला. मात्र, नंतर पगार देणे थांबवण्यात आले आणि आश्वासन दिलेल्या नोकऱ्याही उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत.
प्राथमिक तपासात आरोपींनी विविध उमेदवारांकडून एकूण ४३ लाख ६२ हजार रुपयांहून अधिक रक्कम जमा केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांमध्ये खळबळ उडाली आहे.
खराडी पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून आणखी किती उमेदवारांची फसवणूक झाली आहे, तसेच या घोटाळ्यात इतर कोणाचा सहभाग आहे का, याची चौकशी केली जात आहे.
