Pune Crime News | BSNL ची कॉपर केबल क्रेन लावून ड्रेनेज लाईनमधून काढून चोरुन नेताना 9 जणांना अटक, दिल्लीहून आले होते चोरटे, पुण्यातील दोघांना 2 लाख देऊन केला होता प्लॅन

Pune Crime News | 9 people arrested while stealing BSNL's copper cable from the drainage line using a crane, the thieves had come from Delhi, the plan was to pay 2 lakhs to two people from Pune

पुणे : Pune Crime News | हडपसर येथील इंडस्ट्रियल एरिया मध्ये ड्रेनेज लाईनमध्ये टाकलेली बीएसएनएलची केबल क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढून तिचे तुकडे करुन ट्रकमध्ये टाकून चोरुन नेणार्‍या दिल्लीतील टोळीला रात्रगस्तीवरील पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून पोलिसांनी ३४ लाख ८० हजार रुपयांची २ हजार ९०० किलो कॉपर केबल, ३० लाखांची क्रेन, १५ लाखांचा आयशर ट्रक, मोपेड असा ८० लाख ७० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. दिल्लीहून आलेल्या या चोरट्यांना मदत करण्यासाठी पुण्यातील दोघांनी २ लाख रुपये त्यांच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.

अस्लम सगीर खान Aslam Sageer Khan (वय ३९, रा. तिलकनगर, वेस्ट, दिल्ली), आरिफ बुंन्दुखाँ खान Arif Bundukhan Khan (वय ४०, रा. बुलंद शहर, उत्तर प्रदेश), शोहेब हारुन खान Shohaib Haroon Khan (वय २५, रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश), सलमान इद्रीस मलिक Salman Idrees Malik (वय ३३, रा. लक्ष्मी मार्केट, दिल्ली), नरेश कुमार श्रीशिवचरण Naresh Kumar Srishivacharan (वय ४३, रा. बवानी खेडा, जि. बिवानी, हरियाना), नवी मोहम्मद शान मोहम्मद Navi Mohammed Shan Mohammed (वय ३५, रा. बुंलद शहर, उत्तर प्रदेश), अनिस अन्सारी मोहम्मद गियासुद्दीन Anis Ansari Mohammad Giasuddin (वय २२, रा. बेतीया, बिहार), क्रेन चालक अफाक अन्सारी रफिक अन्सारी Afaq Ansari Rafiq Ansari (वय २२, रा. बेतीया, बिहार), प्रविण दादासाहेब बागुल Pravin Dadasaheb Bagul (वय ३३, रा. शिंदे वस्ती, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सरताज हुसेन (रा. फिरोजाबाद, उत्तर प्रदेश), अमन (रा. गोंडा, बिहार), तौफिक (रा. बदांयु, उत्तर प्रदेश), अली मोहम्मद उर्फ लल्लन (रा. ख्याला, दिल्ली), अनिल देडे (रा. रामटेकडी, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हडपसर इंडस्ट्रीयल एरियामधील हनीवेल कंपनीजवळ, आश्रय हॉटेलसमोर ९ मे रोजी पहाटे ३ वाजता घडला.

याबाबत पोलीस अंमलदार अर्शद रफिक सय्यद यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अर्शद सय्यद, पोलीस हवालदार गाढवे, अंमलदार नील सय्यद, सुतार, चव्हाण हे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या आदेशाने कॉबिंग तसेच राऊंड अप ऑपरेशन दरम्यान पेट्रोलिंग करत होते. पोलीस अंमलदार नील सय्यद, मदने यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, हनीवेळ कंपनीजवळ काही जण संशयास्पदरित्या ड्रेनेज पाईप लाईनची झाकण काढून त्यामधील कॉपरची वायर क्रेनच्या सहाय्याने ओढून बाहेर काढत असून त्याचे तुकडे करुन एका आयशर ट्रकमध्ये टाकत आहेत. या बातमीची वरिष्ठांना माहिती सांगून त्यांनी पोलीस ठाण्यातून आणखी मदत मागवली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शेख, लोंढे हे सोबत स्टाफ घेऊन हनीवेळ कंपनीजवळ गेले. तोपर्यंत गस्तीवरील अंमलदारांनी तेथे जाऊन पाहणी केली असता मिळालेल्या माहितीनुसार क्रेनच्या सहाय्याने ड्रेनेज लाईनमधून केबल काढून त्याचे तुकडे करुन ट्रकमध्ये टाकत होते.

केबल काढून ती ट्रकमध्ये टाकून ते चोरी करुन घेऊन जात असताना थोड्या अंतरावर पोलीस उपनिरीक्षक शेख, लोंढे व इतरांनी ट्रक अडवला. उर्वरीत स्टाफने क्रेनचालक व तेथे वॉच करण्यासाठी थांबलेल्या लोकांना पकडले. ९ संशयितांना पकडले. उर्वरीत ४ ते ५ जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले की, पळून गेलेला त्यांचा साथीदार सरताज हुसेन, तौफिक यांच्यासह दिल्ली येथून साधारण ८ दिवसांपूवी पुण्यात आलो. आम्ही हनीवेल कंपनी येथे ड्रेनेज पाईप लाईनमधून बीएसएनएलची जुनी कॉपरची मोठी केबल काढण्याची योजना बनवली.

आम्ही तेथे पाहणी करीत असताना रामटेकडी येथे राहणारा अनिल देडे हा तेथे आला. त्याने आमचा बेत ओळखुन आम्हास म्हणाला की, तुम्हाला जर येथुन केबल बाहेर काढायची असेल तर त्याकामी मी तुम्हाला मदत करतो. तुम्ही मला व माझा मित्र प्रविण बागुल यांना ३ लाख रुपये द्या. आम्ही येथे कसलीही अडचण येऊ देणार नाही़ असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून अनिल देडे आणि प्रविण बागुल यांना २ लाख रुपये दिले. उरलेले काम झाल्यावर देणार होतो. वानवडी पोलिसांनी ९ जणांना अटक करुन ८० लाख ७० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख तपास करीत आहेत.

You may have missed