Pune Crime News | घराचा दरवाजा वाजविल्याचा जाब विचारल्याने स्वतःला भाई म्हणणाऱ्या गुंडांनी वडील, मुलावर तलवारीने वार करुन केला खुनाचा प्रयत्न
पुणे : Pune Crime News | गल्लीमधुन जाताना घराचा दरवाजा वाजविल्याचा जाब विचारल्याने स्वतःला भाई म्हणवणाऱ्या गुंड व त्याच्या साथीदाराने तलवारीने वार करुन मुलगा व त्याला वाचविण्यासाठी आलेल्या वडिलांवर तलवारीने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
याबाबत स्वप्नील जयद्रथ गायकवाड (वय 20, रा. निरंकार भवन, बालाजीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अमोल सिकंदर रामप्रसाद Amol Sikandar Ramprasad (वय 19) आणि समाधान बाळु पोतदार Samadhan Balu Potdar (वय 23, दोघे रा. बालाजीनगर, भोसरी) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. हा प्रकार बालाजीनगर झोपडपट्टी येथे फिर्यादी यांच्या घरासमोर 26 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकाच वस्तीत राहायला आहेत. गायकवाड यांच्या घरासमोरील अडीच फुट असणाऱ्या गल्लीमधून वस्तीत राहणारे रामप्रसाद व समाधान पोतदार हे रात्री 10 वाजता जात होते. त्यावेळी त्यांनी गायकवाड यांच्या घराचा दरवाजा वाजविला. गायकवाड यांनी कोण आहे, असे विचारले. त्यावर त्यांनी तुझा बाप आहे, असे म्हटल्याने त्यांनी दरवाजा उघडला. ते व त्यांचे वडिल जयद्रथ गायकवाड हे बाहेर आले. तेव्हा दोघांच्या हातात लोखंडी तलवारी असल्याचे त्यांनी पाहिले. स्वप्नील यांनी दरवाजा का वाजविला असे विचारले. समाधान पोतदार याने शिवीगाळ करुन त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
रामप्रसाद म्हणाला, तू मला ओळखत नाही का, मी इथला भाई आहे, असे म्हणून त्याने हातातील तलवार उगारुन मारण्याचा प्रयत्न केला. तो वार स्वप्नील यांनी चुकवला. त्यावर त्याने तुला जिवंत सोडत नाही, असे म्हणून डोक्यावर तलवारीने दुसरा वार केला, तो हातावर लागला. स्वप्नील याला वाचविण्यासाठी त्याचे वडिल पुढे आले. तेव्हा त्याने त्यांच्याही हातावर वार करुन जखमी केले. त्यांचा आरडाओरडा ऐकून लोक जमा होऊन त्यांना वाचविण्यास येऊ लागले, हे पाहून रामप्रसाद याने हातातील तलवार हवेत फिरवुन शिवीगाळ करत म्हणाला की, कोणाही मध्ये पडणार नाही, नाही तर एक एकाला संपवुन टाकीन, असे म्हणून ते निघुन गेले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमित पाटील तपास करीत आहेत.
