Pune Crime News | प्रेमप्रकरणातून तरुणीचा गळा ब्लेडने चिरुन जीवे मारण्याचा प्रयत्न; चंदननगरमधील घटनेतील तरुणीची प्रकृती चिंताजनक, प्रियकर फरार
पुणे : Pune Crime News | प्रेमप्रकरणात झालेल्या वादातून प्रियकराने घरात शिरुन तरुणीचा गळा ब्लेड चिरुन तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे़ तरुणीवर खासगी रुग्णालयातील अति दक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे.
उजालादेवी जसवंतसिंग दोहरे (वय २२, सध्या रा. दिनकर पठारे वस्ती, चंदननगर, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे.
याबाबत उजालादेवीचा मोठा भाऊ भगतसिंग दोहरे (वय २५) याने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दिलीप राठोड (रा. चंदननगर, मुळ रा. हिंगोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उजालादेवी आणि आरोपी दिलीप राठोड हे अहिल्यानगर रस्त्यावरील एका मॉलमध्ये काम करत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दिलीप राठोड याने मॉलमधील नोकरी सोडली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू झाला. उजालादेवी ही चंदननगरमघील पठारे वस्ती भागात राहायला आहे. बुधवारी २९ एप्रिल रोजी रात्री दहा वाजता राठोड पठारे वस्ती भागात आला. तरुणी एकटीच घरात होती. तरुणीचा भाऊ भगतसिंग आणि त्याची पत्नी कामावर गेले होते. उजालादेवी यांच्या घरात तो शिरला. त्याला घरात आल्याचे पाहून उजाला देवी व राठोड यांच्यात वाद झाला. त्याने ब्लेडने तिचा गळा चिरला. राठोडने केलेल्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. जखमी अवस्थेत तिने भाऊ भगतसिंग याच्या मोबाइलवर संपर्क साधला. तू लवकर घरी ये. मला एकाने मारले आहे, असे तिने भावाला सांगितले. त्यानंतर भावाने तेथे धाव घेतली. भावाने तिला ससून रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
तरुणीचा गळा चिरण्यात आल्यानंतर तिला बोलता येत नव्हते. पोलिसांनी तिला विचारणा केली. तेव्हा तरुणीने पेन आणि कागद देण्यास सांगितले. कागदावर तिने आरोपीचे नाव लिहिले.
पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश बडाख यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. पोलीस निरीक्षक अमोल धस तपास करीत आहेत.
