Pune Crime News | 8 बेस व 8 टॉप लाऊड स्पीकर लावून ध्वनी प्रदुषण करणार्या दहीहंडी मंडळावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | लाऊड स्पीकरसाठी ४ बेस व ४ टॉप इतकीच परवानगी असताना त्याच्या दुप्पट साऊंड लावणाऱ्या बिबवेवाडी येथील मंडळावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राहुल प्रकाश जगताप Rahul Prakash Jagtap (रा. बिबवेवाडी ओटा, बिबवेवाडी) असे श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या अध्यक्षाचे नाव आहे. या वर्षीच्या दही हंडी मंडळावर गुन्हा दाखल झालेले पहिले मंडळ आहे.
याबाबत पोलीस अंमलदार प्रतिक दिलीप करंजे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ध्वनी प्रदुषणाबाबत सर्वांना इशारा दिला होता की, लाऊंड स्पीकरसाठी ४ बेस व ४ टॉप यांना परवानगी देण्यात येणार आहे. त्यापेक्षा अधिक लाऊंड स्पीकर लावून ध्वनी प्रदुषण केल्यास कारवाई करण्यात येईल़ साऊंड सिस्टिम जप्त करण्यात येईल.
बिबवेवाडी ओटा येथील श्रीकृष्ण मंडळाने दहीहंडी कार्यक्रमासाठी पोलीस ठाण्याकडून पारंपारिक वाद्य वापरणेचा परवाना घेतला. त्यात लाऊड स्पीकर वापरण्याबाबतच्या लेखी आदेशाचा भंग करुन ८ बेस व ८ टॉप असे लाऊड स्पीकर लावून सार्वजनिक ठिकाणी ध्वनी प्रदूषण केल्यामुळे नागरिकांना त्रास झाला आहे. त्यामुळे मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक गरड तपास करीत आहेत.
