Pune Crime News | प्राचार्याला पोक्सोच्या गुन्ह्याची भिती दाखवून 7 लाखांची खंडणी उकळणाऱ्या पीएसआयसह 3 पोलिसांवर गुन्हा दाखल; पोलीस आयुक्तांना मुलीने दिलेल्या माहितीवरुन आला धक्कादायक प्रकार उघडकीस
पुणे : Pune Crime News | महाविद्यालयातील विद्यार्थीनीला धाक दाखवून अपहरण केल्याची तक्रार असल्याचे सांगून प्राचार्याला पोक्सोच्या गुन्ह्याची भिती दाखवून शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार १८ जुलै ते २८ जुलै २०२५ दरम्यान घडला होता. याप्रकरणाची माहिती यातील संबंधित मुलीने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन सांगितली. पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेला याचा तपास करण्यास सांगितले. त्यानंतर गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक अजित बडे (PSI Ajit Bade), मार्शल सोनाली हिंगे (Sonali Hinge Police) आणि पोलीस अंमलदार सुदाम तायडे (Sudam Taidye Police) अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलिसांची नावे आहेत. हे सर्व जण शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. अजित बडे हे आता सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. दामिनी मार्शल म्हणून कार्यरत असलेल्या सोनाली हिंगे या रील स्टार म्हणून प्रसिद्ध आहेत.
याबाबत एका प्राचार्यांनी तक्रार दिली आहे. ते धनकवडीत राहतात. जुलै २०२५ मध्ये ते काम करीत असलेल्या महाविद्यालयात हे तिघे पोलीस गेले. अजित बडे याने विचारले की, तुम्ही एका मुलीचे कागदपत्रे काढून ठेवली आहेत का? त्यावर प्राचार्य यांनी प्रवेशाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांची सर्व कागदपत्रे आम्ही आमच्याकडे ठेवतो. त्यावर बडे याने या विद्यार्थीनीला तुम्ही मेट्रो स्टेशनवर बंदुकीचा धाक दाखवून तिला गाडीमध्ये ओढले असल्याची तुमच्या विरोधात तक्रार आली असल्याचे सांगितले. त्यांच्यासमोर एक कागद ठेवला. ती तक्रार वाचल्यावर प्राचार्य यांनी हे खोटे असल्याचे सांगितले. ही मुलगी १८ वर्षापेक्षा कमी वयाची असल्याने तुमच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल होईल, अशी भिती दाखविली. आपल्याला अटक होईल, संस्थेचे नाव बदनाम होईल, अशी धमकी दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी त्यांनी मुलीशी बोलून काही होतेय का हे सांगतो, त्यानंतर त्यांच्याकडे १० लाख रुपयांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर बडे याने त्यांना धमकावले. शेवटी प्राचार्यांनी बदनामीच्या भितीने ७ लाख रुपये मुलीच्या शिक्षणासाठी दिले.
याबाबत याच्याशी संबंधित मुलीने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन काही दिवसापूर्वी याची माहिती दिली. आपल्याला पोलिसांनी कसा खोटा अर्ज करायला सांगितले, हे या मुलीने सांगितले. पोलीस आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांनी याची चौकशी केली. प्राचार्य यांना बोलावून मुलीचा तक्रार अर्ज दाखविला. त्यावेळी प्राचार्य यांनी पोलिसांनी आपल्याकडून कसे पैसे उकळले. याची माहिती दिली. त्याची चौकशी केल्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. त्यानुसार गुरुवारी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप तपास करीत आहेत़.
