Pune Crime News | भूतबाधा काढण्यासाठी मिरचीची धुरी देऊन खिडकीला बांधून मारहाण करणार्‍या तृतीयपंथी गुरुसह चौघांवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | सतत आजारी असल्याने भूतबाधा झाली असल्याचे सांगून भूतबाधा काढण्यासाठी उपाय योजना करण्याच्या नावाखाली ७० हजार रुपये घेतले. खिडकीला बांधून मिरचीची धुरी देऊन मारहाण केल्याच्या आरोपावरुन तृतीयपंथी समाजातील एका गुरु महिलेस चौघांवर फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आशा पुजारी (वय ३५), अश्विन इंगळे (वय २८), ज्योती पुजारी (वय ३०), सोनाली (वय ३०, सर्व रा. बैलबाजार, कुर्ला, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार गणेश पेठेतील मठ तसेच कुर्ला येथील मठात २६ एप्रिल ते १८ सप्टेंबर २०२६ दरम्यान घडला. याबाबत एका २६ वर्षाच्या तृतीयपंथी महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही तृतीयपंथी महिला असून जोगवा मागून उदरनिर्वाह करते. मागील ३ वर्षांपासून ती किन्नर समाजाकरीता गणेश पेठेतील मठात रहात आहे. मागील एक वर्षापासून त्यांची तब्यत बरी नसल्याने त्या वारंवार डॉक्टरकडे जात असे. तसेच मठामध्ये झोपून राहत असे. एप्रिल २०२६ मध्ये इंस्टाग्राम अकाऊंटवर तृतीयपंथी समाजातील एक गुरु आशा पुजारी या लोकांच्या अडचणी देवीच्या आशिर्वादाने सोडवत असल्याचे दिसले. त्यांनी आपल्या मानसिक व शारीरीक त्रासाबाबत त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मेसेज करुन माहिती दिली. त्यांनी फोन करुन आपण पुण्यात येणार असल्याचे सांगितले. २६ एप्रिल २०२६ रोजी अश्विन इंगळे व गुरु आशा पुजारी या डुल्या मारुती मंदिराजवळ भेटल्या. त्यांनी त्यांच्याकडे अलौकिक शक्ती आहे, असे सांगून फिर्यादी यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांच्या जिवाला धोका आहे, असे सांगितले. तसेच तुला भूतबाधा झाली आहे. ती काढावी लागेल, नाहीतर तू मरशील, असे सांगून तुला मुंबई येथील कुर्ला येथे यावे लागेल, असे सांगितले. तुझ्यावर उपचार करण्याकरीता गुरु आशा पुजारी हिने ५० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. तू पैसे दिले नाही तर तसेच मी आता तुझ्याबाबतीत उतारा काढला नाही तर व मंत्रांचे उच्चार केले नाही तर तुझा मृत्यु होईल, अशी भिती दाखवुन अश्विन इंगळे याच्या फोन पेवर ५० हजार रुपये घेतले.

त्यानंतर त्या २९ एप्रिल रोजी कुर्ला येथील बैल बाजारमधील मठात गेल्या. आशा पुजारी व त्यांचे तेथे हजर असलेल्या इतर तृतीयपंथींनी त्यांना भितीदायक अघोरी कृत्य करण्याकरीता चालू करुन आशा पुजारी यांच्याकडे दैवी शक्ती असल्याचे भासवले. त्यांच्याकडे असलेली मोठी बाहुली, मिरची, तुरटी, उडीद टाचण्या, लिंबु, छोट्या छोट्या बाहुल्या फिर्यादी समोर रिंगणात व विशिष्ट त्रिकोणी आकारात ठेवून उतारा काढला. हा कार्यक्रम ४ ते ५ तास सुरु होता. त्यानंतर दुसर्‍या दिवशी आशा पुजारी गुरुने सांगितले की यावरुन तुझ्या तब्येतमध्ये फरक पडेल, तुला कसलाही त्रास होणार नाही. तुला फरक पडला नाही तर तु ८ दिवसांनंतर कधीही परत ये, असे सांगितले. त्यानंतर त्यांना फरक पडला नाही. त्यांनी आशा पुजारी यांना सांगितल्यावर त्यांनी मागील उतारा काढण्याचे वेळी एक महत्वाची गोष्ट आम्ही करायची विसरलो, तू परत मठामध्ये ये. त्यानंतर १० मे रोजी त्या कुर्ला येथे गेल्या. तेथील तृतीयपंथींनी आशा पुजारी यांच्याकडे दैवी शक्ती असल्याचे भासवले, असा आरोप फिर्यादी यांनी केला आहे. त्यांच्याकडे असलेली मोठी बाहुली, मिरची, तुरटी, उडीद टाचण्या, लिंबु, छोट्या छोट्या बाहुल्या फिर्यादी यांच्यासमोर रिंगणात व विशिष्ठ त्रिकोणी आकारात ठेवून उतारा काढला.

एक हिरव्या रंगाचे मोठ्या आकाराचे फळ देऊन धुर केला. आशा पुजारी व त्यांचे सोबत असणारे इतर तृतीयपंथी साथीदार यांनी फिर्यादी यांचे कपडे काढून मिरचीची धुरी देऊन त्यांना खिडकीला बांधून मारहाण केली. त्यांना शारीरीक त्रास देऊन विविध मंत्र उच्चारण्यास सुरुवात करुन आता तुला बरे वाटेल, असे बोलून दमदाटी केली. आशा पुजारी हिने फिर्यादी यांच्या छातीवर तसेच गुप्त भागावर मारहाण केली. तसेच दमदाटी करुन अश्विन इंगळे याच्या अकाऊंटवर २० हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्याचवेळी त्यांनी फिर्यादी यांच्या कानात असलेले  सोन्याचे फुल व वेल असे दीड तोळ्याचे दागिने काढून घेतले होते. त्यानंतर वेळोवेळी त्यांना कॉल करुन तसेच त्यांचे  व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मंत्रोच्चाराद्वारे मारुन टाकण्याची भाषा वापरुन पैशांची मागणी केली. सप्टेंबर महिन्यात गुरु आशा पुजारी, अश्विनी इंगळे, सारिका, सोनाली हे रिक्षाने डुल्या मारुती चौक येथे येऊन त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

फरासखाना पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा अधिनियम यासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक राजेश महाला तपास करीत आहेत.

You may have missed