Pune Crime News | महिलांना मलेशियाला पर्यटनाला नेण्यासाठी पैसे घेऊन ऐनवेळी ट्रिप रद्द करुन पावणे नऊ लाखांचा गंडा घालणार्या सन हॉलिडे ट्रॅव्हल्सच्या संचालकावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | १० महिलांना मलेशियाला पर्यटनाला घेऊन जाण्याचे कबुल करुन ऐनवेळी ट्रिप रद्द करुन पैसे परत न देता ८ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक करणार्या सन हॉलिडे ट्रॅव्हल्स एजन्सीच्या संचालकाविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका ५२ वर्षाच्या डॉक्टर महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी नरेश लालचंद मिरवाणी Naresh Lalchand Mirwani (रा. कुमार प्रिन्स संस्कृती शाळेसमोर, उंड्री) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ४ ऑगस्ट २०२५ ते १५ ऑक्टोंबर २०२५ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या सोसायटीतील महिलांनी एकत्र येऊन जून २०२५ मध्ये डिसेंबर २०२५ मध्ये मलेशिया येथे पर्यटनासाठी जाण्याचे नियोजन केले. त्यांच्या ओळखीच्या मैत्रिणीने सन हॉलिडे ट्रॅव्हल्स एजन्सीचे मालक नरेश लालचंद मिरवाणी असल्याचे सांगितले. नरेश मिरवाणी याने त्यांना मलेशिया येथे पर्यटनासाठी नेण्यास कबुल करुन प्रत्येकी ८७ हजार ३०० रुपये एवढा खर्च येत असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे सर्व १० जणांनी मिळून ८ लाख ७३ हजार रुपये नरेश मिरवाणी याला दिले. ट्रिपला जाण्याची तयारी करत असताना ११ नोव्हेबर २०२५ रोजी नरेश मिरवाणी याने नियोजित मलेशिया ट्रीप तेथे उद्भवलेली अनपेक्षित परिस्थितीमुळे रद्द करीत असून सर्व दिलेली रक्कम पुढील १५ दिवसात परत करेन, असे ई मेल करुन सांगितले. त्यावर विश्वास ठेवून पैसे परत मिळण्याची ते वाट पहात होते. त्याला भरलेली रक्कम परत मागितल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याने सर्वांना पुढील तारखेचे धनादेश दिले. धनादेश वटविण्यास वारंवार पुढील तारखेस वटविण्यास सांगायचा. त्यांच्यापैकी २ महिलांनी बँकेत चेक टाकल्यावर बँक खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसल्याने ते चेक वटले नाही. त्यानंतर या महिलांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक धनंजय गाडे तपास करीत आहेत.
