Pune Crime News | मनपाच्या आदेशाचे उल्लंघन भोवले; सिंहगड सिटी स्कूलचे संस्थापक मारुती नवले आणि सुनंदा नवले यांच्यावर गुन्हा दाखल

Pune Crime News | Chaos over violation of PMC orders; case filed against Sinhgad City School founders Maruti Navale and Sunanda Navale

पुणे : Pune Crime News | पुणे महानगरपालिकेच्या आदेशाचे उल्लंघन करून शासकीय परवानगीशिवाय शाळेचे स्थलांतर केल्याचा तसेच नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचा आरोप करत सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या सिंहगड सिटी स्कूलच्या संस्थापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या तक्रारीवरून कोंढवा बुद्रुक पोलिसांनी ही कारवाई केली.

या प्रकरणी संस्थेचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले (वय 52) आणि संस्थेच्या सचिव सुनंदा मारुती नवले (वय 50) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालयातील शिक्षण विभागाचे सहायक प्रशासकीय अधिकारी शंकर रामचंद्र मांडवे (वय 53) यांनी याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीअंतर्गत कोंढवा बुद्रुक परिसरात चालविण्यात येणारे सिंहगड सिटी स्कूल कोणतीही शासकीय परवानगी न घेता दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याचा आरोप आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी 12 फेब्रुवारी 2026 रोजी संस्थेला अधिकृत पत्र पाठविले होते. या पत्राद्वारे शाळेने कोणतेही नवीन प्रवेश देऊ नयेत आणि शाळा मूळ मंजूर ठिकाणीच चालवावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.

मात्र, या आदेशाचे पालन न करता शाळेचे कामकाज सुरू ठेवण्यात आले आणि शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये इयत्ता पहिलीत 62 नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तसेच महापालिकेच्या आदेशाची माहिती पालकांपासून लपवून हे प्रवेश देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. शाळेचे कथित बेकायदेशीर स्थलांतर आणि नव्या प्रवेशांची बाब गंभीर असल्याचे नमूद करत शिक्षण विभागाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

या तक्रारीच्या आधारे कोंढवा बुद्रुक पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

You may have missed