Pune Crime News | विद्यानंद बापट यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखाविल्या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात तक्रार; कारवाईची मागणी
पुणे : Pune Crime News | ध्वनीप्रदूषणाबाबत भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांनी धार्मिक भावना दुखाविल्या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नगरसेवक गणेश बुगजी कल्याणकर (रा. घोरपडे पेठ) यांनी केली आहे. कल्याणकर यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. (Vidyanand Bapat)
पुणे इंटरनॅशनल ऑडिटोरियम येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये विद्यानंद बापट यांनी केलेल्या भाषणातील टिकेवरुन हा तक्रार अर्ज केला. पुणे इंटरनॅशनल ऑडिटोरियम येथे मधुराज फाऊंडेशन, ब्राईट सोसायटी आणि विचारवेध असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एका जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यानंद बापट यांनी हिंदू धर्म, धार्मिक परंपरा आणि कोट्यवधी हिंदू धर्मियांच्या श्रद्धास्थानांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानकारक विधाने केली. त्यांनी त्यात शेण खाऊन आणि गोमूत्र पिऊन माजलेले देवभोळे आणि धर्मभोळे उत्सवखोर, सण उत्सव हा मुर्खपणा आहे, शेण खाऊन आणि गोमूत्र पिऊन काय बुद्धी डेव्हलप होणार, अशी बापट यांनी वक्तव्य केली आहेत.
हिंदू धर्मात गाईला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. धार्मिक विधी, पुजा आणि आयुर्वेदामध्ये गोमूत्र आणि गोमय (शेण) यांना पवित्र स्थान आहे. बापट यांनी जाणीवपूर्वक अशा अत्यंत अश्लाघ्य, हिणकस आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर करुन हिंदूच्या धार्मिक आचार विचारांची जाहीरपणे थट्टा उडवली आहे. कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आणि श्रद्धास्थानांचा तीव्र अपमान केल्याप्रकरणी विद्यानंद बापट यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
याबाबत खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे यांनी सांगितले की, नगरसेवक गणेश कल्याणकर यांचा तक्रार अर्ज पोलिसांना मिळाला आहे. विद्यानंद बापट यांनी धर्माविषयी बोलून आमच्या भावना दुखावल्या असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी विनंती या तक्रार अर्जात करण्यात आली आहे. या तक्रार अर्जाची चौकशी करण्यात येत आहे.
