Pune Crime News | पार्किंगच्या वादातून कारची काच फोडून मारहाण करुन जखमी करण्याच्या कोंढवा, फुरसुंगीत घटना

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | पुणे शहरात वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न मोठा जटील बनला आहे. दिवसभर लोक कामानिमित्त बाहेर गेलेले असतात. रात्री परत आल्यावर सोसायटी व तिच्या लगतच्या रस्त्यांवर दुचाकी, कार पार्क करण्यावरून अनेक ठिकाणी दररोज वादावादी, भांडणांचे प्रसंग घडताना दिसत आहे. गाडी लावण्यावरुन झालेल्या भांडणामध्ये शिवीगाळ करुन कारची काच फोडून तरुणाला मारहाण करण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. कोंढवा आणि फुरसुंगी येथे घडलेल्या या घटनांमध्ये पोलिसांनी ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत संतोष वामन बरेकर (वय ४९, रा. महादेव सीताई निवास, संत ज्ञानेश्वरनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दीप पवार, अभिषेक पवार, विद्या पवार (रा. दिशा रेसिडेन्सीसमोर, संत ज्ञानेश्वरनगर, कोंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना त्यांच्या राहत्या सोसायटीमध्ये २१ ऑक्टोंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप पवार याने लावलेली दुचाकी फिर्यादी यांनी काढण्यास सांगितली. या कारणावरुन राग मनात धरुन तिघांनी फिर्यादी व त्यांची पत्नी यांना शिवीगाळ केली. संतोष बरेकर यांना बांबुने मारहाण करुन गंभीर जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक मासाळ तपास करत आहेत.
दुसरी घटना ऊरुळी देवाची येथील संत ज्ञानेश्वर कॉलनी, आदर्शनगर येथे २१ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वानऊ वाजता घडली. याबाबत योगेश अमृतराव देशमुख (वय ३८, रा. शिवरत्न सृष्टी सोसायटी, हांडेवाडी रोड, सातवनगर) यांनी फुरसुंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राजेश रमेश डांगी Rajesh Ramesh Dangi (वय २६), उमेश रमेश डांगी Umesh Ramesh Dangi (वय २८), रमेश डांगी (वय ५५) आणि रमेश डांगी यांची पत्नी (सर्व रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, आदर्शनगर, ऊरुळी देवाची) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा भाऊ शरद देशमुख यांनी रस्त्याच्या कडेला गाडी पार्क केली होती. त्यावरुन त्यांचा आरोपींबरोबर वाद झाला. आरोपींनी शिवीगाळ करुन दोघांना हाताने व लाकडी काठीने मारहाण करुन जखमी केले. शरद देशमुख यांची वॅगनार गाडीची समोरील काच फोडून नुकसान केले आहे. पोलीस हवालदार लोणकर तपास करीत आहेत.

You may have missed