Pune Crime News | शेअर मार्केटमधून दरमहा 5 टक्के परताव्याचे आमिष! 45 गुंतवणूकदारांची 12 कोटींची फसवणूक; ‘राजपूत वाइज इन्व्हेस्टमेंट’च्या अरविंद राजेंद्र राजपूत विरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून दरमहा पाच टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ४५ गुंतवणूकदारांची सुमारे १२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘राजपूत वाइज इन्व्हेस्टमेंट’च्या नावाखाली विश्वास संपादन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद राजेंद्र राजपुत Arvind Rajendra Rajput (रा-हाऊस नं ११७०, भुडे वस्ती, मुंबई बँगलोर हायवे, स्क्रिस्टल होंडा शोरुम जवळ, बावधान, पुणे-२१. कायमचा पत्ता – युनिट नं-८०७, टॉवर १९, ऑगस्ट-बी, लोधा बेलमेंडो, मुंबई पुणेएक्सप्रेस हायवे एम सी ए क्रिकेट स्टेडीयम समोर, गहुंजे, ता मावळ, जि पुणे) याने ‘राजपूत वाइज इन्व्हेस्टमेंट’ या नावाने कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी शेअर्स, स्टॉक एक्स्चेंज आणि शेअर मार्केटमधील ट्रेडिंगचे काम करत असल्याचे सांगून त्याने अनेक गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला.
दरमहा ५ टक्के परताव्याचे आश्वासन
आरोपीने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा पाच टक्के परतावा मिळेल, असे आश्वासन देत २०२२ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम स्वीकारली.
मूळ रक्कम आणि परतावा न दिल्याचा आरोप
तक्रारीनुसार, गुंतवणूकदारांनी दिलेली मूळ रक्कम आणि त्यावरील परतावा न देता आरोपीने विश्वासघात केला. या प्रकरणात एकूण ४५ गुंतवणूकदारांची सुमारे १२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
निधीचा वापर कशासाठी झाला, याचा तपास सुरू
खडक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपीने गुंतवणूकदारांकडून घेतलेल्या निधीचा वापर नेमका कशासाठी केला, तसेच या फसवणुकीची व्याप्ती आणखी मोठी आहे का, याचा तपास सुरू आहे.
