Pune Crime News | गुंतवणुकीवर 25 टक्के परताव्याचे आमिष; IT भरती कंपनीचे सीईओ कार्तिक कमल शर्माच्या विरुद्ध 2.62 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा
पुणे : Pune Crime News | आयटी कंपन्यांसाठी कर्मचारी भरती आणि कौशल्य विकासाची कामे करणाऱ्या कंपनीत गुंतवणूक केल्यास १० ते २५ टक्के परतावा मिळेल, तसेच कंपनीची वार्षिक उलाढाल २० कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, असे आमिष दाखवून तीन गुंतवणूकदारांची तब्बल २ कोटी ६२ लाख ९३ हजार ५३७ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याविरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्तिक कमल शर्मा Kartik Kamal Sharma (रा. कांदिवली पूर्व, मुंबई) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध फसवणूक, विश्वासघात आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनकवडी येथील ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली असून, मे ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत विमाननगर परिसरात हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा ‘टेक्रूट ३ कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी असून, तक्रारदाराची त्याच्याशी ओळख झाली होती. आरोपीने स्वतःची कंपनी आयटी क्षेत्रासाठी कर्मचारी भरती व कौशल्य विकासाची कामे करत असल्याचे सांगून नव्या व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त केले. गुंतवणुकीवर आकर्षक परतावा मिळण्याचे आश्वासन देत त्याने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
