Pune Crime News | पुणे : लग्नासाठी 14 कोटींचा महाल बुक; नियोजित पत्नीच्या वाढदिवसानिमित्त ट्रेकिंगला गेलेल्या प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाचा दरीत पडून दुर्दैवी मृत्यू

Pune Crime News | Pune: A ₹14-crore palace booked for the wedding; son of a prominent builder dies tragically after falling into a gorge while trekking to celebrate his fiancée's birthday.

पुणे / लोणावळा : Pune Crime News |  अवघ्या काही दिवसांत विवाहबंधनात अडकणार असलेल्या तरुणाचा नियतीने क्रूर घाला घालत दुर्दैवी अंत केला. नियोजित पत्नीच्या वाढदिवसानिमित्त लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या २६ वर्षीय मुलाचा सुमारे ४०० फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.

मृत तरुणाचे नाव केतन विशाल अग्रवाल (वय २६, लोढा बेलमोंडो सोसायटी, गहुंजे, ता. मावळ) असे आहे. त्याचे वडील विशाल अग्रवाल हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून, केतनदेखील बांधकाम क्षेत्रात कार्यरत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण, दोन चुलते आणि दोन चुलतभाऊ असा परिवार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नियोजित पत्नीच्या वाढदिवसानिमित्त केतन गुरुवारी सकाळी तिच्यासोबत कारने लोहगड येथे आला होता. दोघे ट्रेकिंग करत असताना गडावरील एका कड्यावरून अचानक त्याचा तोल गेला आणि तो सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळला. गंभीर दुखापतीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शिवदुर्ग मित्र आपत्कालीन पथकाला पाचारण केले. पथकाने जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर घनदाट झाडीत अडकलेला मृतदेह बाहेर काढून गडाच्या पायथ्याशी आणला. त्यानंतर सायंकाळी उशिरा निगडी येथे शोकाकुल वातावरणात केतनवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, केतनच्या विवाहाची तयारी दोन्ही कुटुंबीयांकडून जोरात सुरू होती. राजस्थानमधील उदयपूर येथे भव्य विवाहसोहळ्यासाठी तब्बल १४ कोटी रुपये खर्चून आलिशान महाल बुक करण्यात आला होता. तसेच पाहुण्यांच्या प्रवासासाठी दोन स्वतंत्र विमानांचीही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, ग्रँड विवाहसोहळ्याच्या तयारीदरम्यानच काळाने झडप घातल्याने दोन्ही कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

You may have missed