Pune Crime News | पोस्ट ऑफिस, फूड कॉर्पोरेशन या केंद्र सरकारच्या खात्यात नोकरीचे आमिष दाखवून 27 तरुण-तरुणींची 4 कोटी 88 लाखांची फसवणूक; दिल्लीतील महाराजासह 8 जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News | Luring with government jobs in Post Office and Food Corporation, 27 young men and women scammed for Rs 4.88 crore; case filed against 8 people including a Maharaja in Delhi

पुणे / पिंपरी : Pune Crime News | केंद्र सरकारच्या अखत्यारीत पोस्ट ऑफिस विभागातील ग्राम डाक सेवक, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) विभागात स्टॉक/ सप्लाय इन्स्पेक्टर व लेबर सुपरवायझर आणि मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अ‍ॅन्ड हायवेज ऑफ इंडिया विभागात ग्रुप सी व इतर तत्सम पदांवर नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून त्यांची दिल्लीतील राम मनोहर लोहिया सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्ट घेतली. त्यांना बनावट अपॉईमेंट लेटर व इतर शासकीय दस्तऐवज पाठवून २७ तरुण तरुणींची तब्बल ४ कोटी ८८ लाख ४३ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत एका महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अभिषेक कुमार अजय निगम Abhishek Kumar Ajay Nigam (रा. राजाजीपुरम टिकैत राय तालाब, मोहन रोड, लखनौ, उत्तर प्रदेश), भागवत रामशरण यादव Bhagwat Ramsharan Yadav (रा. स्प्रग सोसायटी, अनुरा काला इंदिरा कन, गोमतीनगर, वाराणसी, उत्तर प्रदेश), डॉ. मनोज मधुकर जैन Dr. Manoj Madhukar Jain (रा. हिल रोड, शंकरनगर, नागपूर), रजनीश रंजन मुदगल Rajnish Ranjan Mudgal (रा. इंदरपुरी सेंटर, ग्रेटर नोएडा), जनुकराम रामसमु यादव Janukram Ramsamu Yadav ( रा. अहिरणपुरवा मोहल्ला, परासराय, इटियाथोक), निरज रमेश श्रीवास्तव Niraj Ramesh Srivastava (रा. साईकुंज अपार्टमेंट, दौलत, पांडेपूर, वाराणसी, उत्तर प्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १ नोव्हेंबर २०२४ ते ३० एप्रिल २०२६ दरम्यान निगडी आणि दिल्ली येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या वास्तुशास्त्र सल्लागार म्हणून निगडीमध्ये काम करतात. त्यांची फेब्रुवारी २०२४ मध्ये व्यवसायानिमित्त पंकज व्यास याच्याशी ओळख झाली. त्याचे मार्फतीने सप्टेंबर २०२४ मध्ये रणजित चव्हाण याच्याशी ओळख झाली. रणजित चव्हाण याने तो शासकीय कार्यालयात लायजनिंगचे काम करत असल्याचे सांगून त्याने डॉ. मनोज जैन (रा. नागपूर) यांच्याशी फोनद्वारे बोलणे करुन दिले. डॉ. मनोज जैन यांनी त्याचे वर्धमान कॉलेज ऑफ फार्मसी, कारंजा लाड येथे कॉलेज असून त्यांची केंद्रीय मंत्रालयात ओळख आहे. ते शासकीय टेन्डर मिळवुन देणे, तसेच एफसीआय (फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) पोस्ट ऑफिस, रोड ट्रान्सपोर्ट मंत्रालय इत्यादी विभागांमध्ये कायमस्वरूपी हमखास नोकरी मिळवुन देऊ शकतात, असे सांगितले.

त्यांचा व्यवसाय शाश्वत नसल्याने त्यांना नोकरीची गरज होती. त्या स्वत: त्यांचा भाऊ, वहिनी यांनाही नोकरीची आवश्यकता असल्याने त्या तिघांनी नोकरीसाठी होकार दिला. रणजित चव्हाण यांच्या सांगण्यावरुन नोव्हेंबर २०२४ मध्ये वाकड येथील सयाजी हॉटेलमध्ये फिर्यादी, त्यांच्या ओळखीचे डॉ. मनोज जैन यांना भेटले. त्यांनी ज्या मुलांना पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी लावली आहे, अशा मुलांची लिस्ट त्यांच्या मोबाईलमध्ये दाखविली. तसेच गव्हर्नमेंट वेबसाईट रिझल्ट लिस्टमध्ये या मुलांची नावे असल्याचे दाखविले. तसेच नोकर भरतीचे कागदोपत्री प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. नोकरीकरीता किती रक्कम द्यायची हे नंतर कळविले जाईल, असे सांगितले.

त्यानंतर त्यांनी पोस्ट ऑफिस, फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्स्पोर्ट अ‍ॅन्ड हायवेज येथील नोकरीसाठी प्रत्येकी १८ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यांना या पदांकरीता भरावयाचे फॉर्मचे नमुने पाठवून प्रथम प्रत्येकी ३ लाख रुपये दिल्यानंतर फॉर्म सबमीट केले जातील व त्यानंतर प्रत्येक उमेदवारांचे मोबाईल फोनवर ओटीपी येईल, असे सांगितले. त्यांनी घरातील तिघे व इतर इच्छुक १९ मुलांनी फॉर्म भरले. एकूण २६ मुलांनी फॉर्म भरुन प्रत्येकी ३ लाख रुपये पाठविले. त्यानंतर प्रत्येकाला टेक्स मेसेजवर ओटीपी आला. तो ओटीपी त्यांनी मनोज जैनला पाठविले. त्यानंतर त्यांची राम मनोहर लोहिया हॉस्पिटल, दिल्ली येथे मेडिकल होणार असून त्यासाठी प्रत्येकी २ लाख रुपये आवश्यक आहेत, असे सांगून ते वेगवेगळ्या खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले. २४ जण १५ जानेवारी २०२५ रोजी दिल्लीत मनोज जैन यांना भेटले. त्यांनी मेडिकलसाठी प्रत्येकी आणखी ५० हजार रुपये प्रमाणे २४ मुलांचे १२ लाख रुपये रोख दिले. जैन याने निरज श्रीवास्तव याची ओळख करुन दिली. त्याने व एका डॉक्टरांनी काही जणांची मेडिकल केली. १८ जणांची परत मेडिकल होईल, असे जैन याने सांगितले.

त्यानंतर दिल्लीतील हॉटेल द अशोका येथे जनक यादव व भागवत शरण ऊर्फ महाराज यांची भेट करुन दिली. जनक यादव हे एफसीआयमधील कर्मचारी आहेत. व महाराज हे दुर्गा सप्तशती ज्या आश्रमात लिहिलेली आहे, त्या मेधा ऋषी आश्रम, रुदावली, अयोध्या येथील महंत आहेत. आपल्या नोकरीचे कामकाज हेच बघत आहेत, असे सांगितले. त्यांनी आपने पुरा इंतजाम नही किया इसलिए लेट हो रहा है, असे सांगितले. त्यावर मनोज जैन याने जसे सांगितले तसे केले आहे, असे त्यांनी सांगितल्यावर तो ठिक है मै आगे का देख लेता हु, असे सांगितले. त्यानंतर १९ जानेवारी रोजी महाराज यांनी मला फक्त १७ लाख मिळाले, बाकीचे मिळाले नसल्याने प्रोसेस थांबली असल्याचे सांगितले. त्यावेळी फिर्यादी यांनी प्रत्येकी साडेपाच लाख रुपये असे १ कोटी २६ लाख ५० हजार रुपये मनोज जैन यांना दिल्याचे सांगितले. फिर्यादी यांनी मनोज जैनला पैशांबाबत विचारल्यावर त्यांनी हा आमच्यातील मामला आहे, असे सांगितले. त्यानंतर नोकरभरतीबाबत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी भागवत महाराज यांनी मुंबईतील ओबेरॉय हॉटेलमध्ये बोलविले. तेथे रजनिश मुदगल, मनिष सिंग उपस्थित होते.

त्यांनी नोकरीबाबत विचारणा केल्यावर राहिलेले पेमेंट केले तर प्रोसेस फास्ट होईल, असे सांगितले. महाराजांनी फिर्यादी यांना विश्वासात घेऊन त्यांचे एटीएम खराब झाल्याचे सांगून त्यांचे डेबिड कार्ड घेतले. त्यावर त्यांनी काही पेमेंट घेतले तसेच त्यावरुन त्यांनी काही खरेदी केली. त्यानंतर सर्व उमेदवारांना एफसीआयमध्ये स्टॉक इन्स्पेक्टर या पदावर सिलेक्शन कन्फर्म झाल्याबाबतचे चिफ जनरल मॅनेजर हेड क्वॉर्टर एफसीआय यांचे सही शिक्का असलेले लेटर ऑफ अपॉईमेंट प्राप्त झाले. या लेटरवरील सही शिक्क्याबाबत संशय निर्माण झाल्याने त्यांनी कॉन्फरन्स कॉलद्वारे महाराज व रजनिश यांच्याकडे विचारणा केली. त्यांनी ते ओरिजनल असल्याचे व नियुक्ती वैध असल्याचे त्यांना पटवुन दिले. त्यानंतर राहिलेल्या मुलांची मेडिकल झाली. तेव्हा महाराज यांनी पुढील रक्कम प्राप्त झाल्यानंतरच अपॉईमेंट लेटर मिळतील, असे सांगितले. सर्व पैसे दिल्यावर त्यांना ११ महिन्यांचे अपॉर्टमेंट लेटर मिळाले. त्यानंतर ट्रेनिंगसाठी प्रत्येक दिवशी ४ ते ५ मुलांना वर्ल्ड ट्रेड सेंटर, दिल्ली येथे बोलावुन मशिनवर मुलांचे अंगठा व सही घेऊन त्यांना माघारी पाठवायचे. असे एक आठवडा झाल्यानंतर त्यांना संशय आला.

तेव्हा अभिषेक निगम व देवकर काका यांनी मुलांची ओरिजनल जॉब ऑर्डर दाखवुन त्यांचा विश्वास कायम केला. नोव्हेंबर २०२५ मध्ये भागवत महाराज व उमेश घोष यांना फिर्यादी यांनी भेटून आम्हाला लवकर जॉईनिंंग द्या किंवा आमचे घेतलेले पैसे परत द्या, अशी वेळोवेळी विनंती केली होती. त्यांनी लवकरच काम होईल, असे सांगून आश्वासन दिले. त्यांना मिळालेले अपॉईमेंट लेटर हे बनावट असल्याचे आणि सरकारी सेवेचा कायदेशीर हक्क प्राप्त झाल्याचा आभास निर्माण करणारी संपूर्ण बनावट नियुक्ती प्रक्रियावर अवलंबुन आपली फसवणुक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पैसे परत मागितल्यावर त्यांना धमक्या देण्यात आल्या. अभिषेक निगम, भागवत महाराज व त्यांचे टीमने अशाप्रकारे आर्मीमध्ये भरती करण्याचे आमिष दाखवुन ४ ते ५ मुलांची फसवणूक केल्याचे त्यांना समजले. शेवटी त्यांनी पिंपरी चिंचवडच्या आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार अर्ज दिला. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी बाबत तांत्रिक विश्लेषण केल्यावर ते दिल्ली येथे असल्याचे समजले़ आर्थिक गुन्हे शाखेचे पथक दिल्ली येथे त्यांचा शोध घेत आहेत.