Pune Crime News | दारु पिण्यास पैसे न दिल्याने डोक्यात दगड घालून खुनाचा प्रयत्न करणार्या दारुड्याला स्वारगेट पोलिसांनी केली अटक
पुणे : Pune Crime News | गटारी अमावस्येच्या दिवशी सकाळी दारु पिण्यास पैसे न दिल्याचा राग मनात धरुन दारुड्याने तरुणाच्या डोक्यात, चेहर्यावर दगडाने मारुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. स्वारगेट पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन या दारुड्याला अटक केली आहे.
राजू शिवलिंगप्पा इकळकी (वय ३५, रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रेम संजय काळे Prem Sanjay Kale (वय २८, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत लक्ष्मीबाई शिवलिंगप्पा इकळकी (वय ५७, रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना गुलटेकडी येथील डायस प्लॉट येथे १२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेसात वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम काळे याने राजू इकळकी याच्याकडे दारु पिण्यास पैसे मागितले होते. राजू यांनी त्याला पैसे देण्यात नकार दिला. याचा राग मनात धरुन प्रेम काळे याने राजू यांना शिवीगाळ करुन मारहाण केली़ चेहर्यावर व डोक्यात दगड वारंवार मारुन त्यांना गंभीर जखमी केले. गंभीर जखमी अवस्थेत राजू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वारगेट पोलिसांनी प्रेम काळे याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील शेळके तपास करीत आहेत.
