Pune Crime News | येरवड्यात निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यावर तीन अल्पवयीनांचा हल्ला; खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

Crime

पुणे : Pune Crime News | येरवड्यातील पं. जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातील मुलांच्या शासकीय निरीक्षणगृहात एका कर्मचाऱ्यावर तीन अल्पवयीनांनी हल्ला केल्याची घटना घडली. या मारहाणीत कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, तीन अल्पवयीनांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष किसन कुंभार (वय ५०, रा. नंदादीप सोसायटी, चऱ्होली फाटा) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी येरवडा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभार हे येरवड्यातील पं. जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातील मुलांच्या शासकीय निरीक्षणगृहात कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. रविवारी (१६ ऑगस्ट) सकाळी साडेदहाच्या सुमारास ते निरीक्षणगृहातील अल्पवयीनांना नाश्ता वाटत होते.

याच वेळी किरकोळ कारणावरून वाद झाला आणि निरीक्षणगृहातील तीन अल्पवयीनांनी कुंभार यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात कुंभार गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी संबंधित तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक देठे करत आहेत.