Pune Crime News | मोक्का, खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यातील 9 महिने फरार असलेल्या गुन्हेगाराला खंडणी विरोधी पथकाने बीडमधून केले जेरबंद

Pune Crime News | MCOCA, criminal who was absconding for 9 months in the crime of attempt to murder arrested by the anti-extortion squad from Beed

पुणे : Pune Crime News | किरकोळ कारणावरुन शिवीगाळ करणार्‍या टोळक्याने तिघांवर वार करुन गाड्यांच्या काचा फोडून शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात दहशत माजवली होती. या टोळक्यांपैकी एक आरोपी गेले ९ महिने फरार होता. खंडणी विरोधी पथकाने त्याला बीडमधून जेरबंद केले आहे.

प्रथम नितीन मोहिते Pratham Nitin Mohite ( रा. माऊली निवास, खडकपुरा पेठ, बीड) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. ही घटना शिवाजीनगर येथील जुना तोफखानामधील आशियाना बिल्डिंगसमोर ७ जून २०२५ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडली होती.

याबाबत समीर उमर फारुख (वय ४८, रा. आशियाना बिल्डिंग, जुना तोफखाना, शिवाजीनगर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी हे मोहल्यातील लोकांसह आशियाना बिल्डिंग समोर बसलेले असताना फॅमिली कोर्टाकडून दुचाकीवर तिघे जण आले. त्यांनी अयान फिरोज शेख याला काय करतोय, असे म्हणून शिवीगाळ केली. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. या तिघांनी हातात दगड घेऊन अयान शेख याला धमकाविण्यास सुरुवात केली. तेव्हा तेथे जमलेल्यांनी त्यांना समजावून सांगत निघून जाण्यास सांगितले. त्यांच्या पैकी एकाने “तु थांब तुला आज मी दाखवतो, तुझा मर्डर टाकतो,” असे म्हणून ते निघून गेले. थोडा वेळाने बायक्या बहिरट, रोहन शिंदे, अथर्व कदम (सर्व रा. बहिरट आळी, शिवाजीनगर गावठाण) यांच्यासह आणखी ४ ते ५ जण आले. त्यांनी फिर्यादी, त्यांचा मुलगा काब शेख यांच्यावर कोयत्याने वार केले. पुतण्या हामजा एजाज खान याच्या डोक्यावर व हातावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. परिसरातील गाड्यांवर कोयते मारून त्यांच्या काचा फोडून दहशत माजवली.

शिवाजीनगर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन त्यातील काही जणांना अटक केली. त्यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली.
यातील आरोपी प्रथम मोहिते हा तेव्हापासून फरार होता. त्याच्या मुळ गावी बीडला जाऊन पोलिसांनी शोध घेतला. परंतु, तो मिळाला नव्हता. आरोपी हा बीडमधील वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याचे समजले होते.

खंडणी विरोधी पथकाकडील पोलीस अंमलदार अमोल आवाड व मयुर भोकरे यांना माहिती मिळाली की, आरोपी हा त्याच्या बहिणीच्या धारुर तालुक्यातील आडस येथील घरी राहत असल्याची समजले. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन सापळा रचला. आरोपी येताच त्याला पकडून पुण्यात आणले. सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अंमलदार रणजित फडतरे, अमोल आवाड, नितीन कांबळे, बालारफी शेख, राजेंद्र लांडगे, दुर्योधन गुरव, मयुर भोकरे, अमर पवार, अझीम शेख, सद्दाम तांबोळी, विनोद चव्हाण, उमेश मोकाशी, शंकर नेवसे, शंकर कुंभार, विजयकुमार पवार, शिवानंद कायगुडे, साधना ताम्हाणे, गीतांजली जांभुळकर यांनी केली आहे.

You may have missed