Pune Crime News | तरुणाच्या मानसिक त्रासाला कंटाळून 17 वर्षाच्या युवतीने इमारतीवरुन उडी मारुन संपविले आपले जीवन, बाणेर पोलिसांनी तरुणावर दाखल केला गुन्हा
पुणे : Pune Crime News | शेजारी राहणार्या मुलाशी का बोलते, यावरुन तरुण तिला त्रास देत होता. तसेच तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. या त्रासाला कंटाळून एका १७ वर्षाच्या युवतीने इमारतीवरुन उडी मारुन आपले जीवन संपविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
साक्षी शिवाजी आवटे (वय १७, रा. बालेवाडी गाव) असे या युवतीचे नाव आहे. याबाबत तिचा भाऊ दीपक शिवाजी आवटे (वय २०, रा. बालेवाडी गाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी गोरख सुग्रीव गोरे Gorakh Sugreev Gore (वय २१, रा. एफ रेसिडेन्सी जवळ, बालेवाडी, मुळ रा. शंकरनगर, पाटोदा, ता. मंठा, जि. जालना) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बालेवाडी येथील कृणाल एक्सपायरी सोसायटीमध्ये ४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी आवटे ही १७ वर्षाच्या युवतीला गोरख गोरे हा त्रास देत असे. शेजारी राहणार्या मुलाशी का बोलते, यावरुन तरुण तिला त्रास देत होता. तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. ४ एप्रिल २०२६ रोजी गोरख गोरे याने या युवतीला शेजारी राहणार्या मुलाशी का बोलतीस असे म्हणून तिला मानसिक त्रास दिला व तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याच्या या त्रासाला कंटाळून या युवतीने इमारतीवरुन उडी मारुन आपले जीवन संपविले. पोलिसांनी गोरख गोरे याच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करीत आहेत.
