Pune Crime News | पुणे : स्क्रॅपच्या मालाने भरलेल्या ट्रकचे फोटो व पावत्या दाखवुन व्यापार्याला 50 लाख रुपयांना फसविल्याच्या आरोपावरून दोघांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | स्क्रॅपच्या मालाने भरलेल्या ट्रकचे फोटो व पावत्या दाखवुन व्यापार्याकडून ५० लाख रुपये घेऊन माल न पुरवता फसवणूक केल्याच्या आरोपावरून स्वारगेट पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दिनेश जयंतीलाल शहा (वय ६२, रा. अंकुर पार्क सोसायटी, महर्षीनगर) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शरद कैलास ढोकले Sharad Kailas Dhokle (वय ४१, रा. गुलमोहर पॅराडाईज, नगर रोड, विमाननगर) आणि निलेश दत्तात्रय खुटवड Nilesh Dattatray Khutwad (वय ४२, रा. लक्ष्मीनगर, पर्वती, सध्या रा. शुभम अपार्टमेंट, पारसी आगरी मंदिराजवळ, रास्ता पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १९ मे ते २३ मे २०२६ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारी, फिर्यादी दिनेश शहा यांचा स्क्रॅप मटेरियल खरेदी करुन ते वेगवेगळे करुन कंपन्यांना पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. त्यांना स्क्रॅपची मागणी आली होती. परंतु, त्यांना स्क्रॅप मटेरियल पुरविणारे मिळत नव्हते. त्यांच्या भावाने त्यांना एक नंबर दिला होता. त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. आरोपी यांनी त्यांना लोड केलेल्या मालाच्या ट्रकचे फोटो पाठविले. तसेच लोड केलेला ट्रक दाखवुन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना हा सेंट्रिंग मटेरियल स्क्रॅप खरेदी व्यवहारापोटी अगोदर पैसे द्यावे लागतील, अशी मागणी केली. त्यांनी ५० लाख रुपयांचा धनादेश आरोपी यांना दिला. हा धनादेश वटल्यानंतरही आरोपींनी स्क्रॅप मटेरियलचा पुरवठा केला नसल्याचा शहा यांचा आरोप आहे. त्यांनी अनेक दिवस वाट पाहिली तरी आरोपींनी स्क्रॅप मटेरियल न पुरविल्याने शेवटी त्यांनी फसवणूक झाल्याची फिर्याद स्वारगेट पोलिसांकडे दिली आहे. पोलीस निरीक्षक प्रदिप सिसोदे तपास करीत आहेत.
