Pune Crime News | ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमावरुन सीओईपीमध्ये राडा; काँग्रेस, अभाविप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमावरुन सीओईपीमध्ये काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रम शनिवारी (२२ ऑगस्ट) एसएसपीएमपीएस प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवारी (२१ ऑगस्ट) सायंकाळपासून या भागातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली.
काँग्रेस आणि एनएसयूआय च्या कार्यकर्त्यांनी सीओईपीच्या वसतीगृहात विद्यार्थ्यांना मारहाण आणि विद्यार्थ्यांना खोलीत डांबून ठेवण्याचा आरोप करुन अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला. शनिवारच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना जबरदस्तीने घेऊन जाण्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर अभाविप च्या कार्यकर्त्यांनी मुख्य प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी सुरु केली. यावेळी काँग्रेस आणि अभाविप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही गट एकमेकांना हाणामारी करीत होते. त्यात एका अभाविपच्या कार्यकर्त्याला एनएसयुआयचे कार्यकर्ते बेदम मारहाण करत होते. हे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप करत लाठीमार करुन मारहाण करणार्यांना पांगविले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
या प्रकरणात काही काँग्रेस कार्यकर्तेही जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
अभाविपने दिलेल्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ५० ते ६० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत काँग्रेस, भाजप आणि अभाविपकडून परस्परविरोधी दावे केले जात आहे.
याबाबत पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी सांगितले की, काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरु असल्याची माहिती मिळाल्यावर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी लाठीमार केला नाही. एकाला बेदम मारहाण केली जात होती. त्याला वाचविण्यासाठी व मारहाण करणार्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला आहे. भाजपकडून तक्रार दिल्यानंतर काँग्रेसच्या ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसकडून कोणतीही तक्रार आली नाही.
ही घटना समजल्यानंतर भाजप व काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते घटनास्थळी जमले. काँग्रेसच्या जखमी झालेल्या कार्यकर्त्यांची काँग्रेस नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली.
