Pune Crime News | नगरसेविकेच्या जागेवर अतिक्रमण करुन पत्र्याचे शेड लावुन स्वत:च्या नावाचा लावला बोर्ड; लोहगाव पोलिसांनी केला गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | नगरसेविकेच्या जागेत अतिक्रमण करुन सिमेंटच्या तारेचे कंपाऊंड काढून त्याठिकाणी पत्र्याचे कंपाऊंड करुन स्वत:चा नावाचा बोर्ड लावण्याचा प्रकार लोहगावामध्ये समोर आला आहे.
याबाबत नगरसेविका हिमाली नवनाथ कांबळे (वय २९, रा. लिओस स्टोनिया, पाम ग्लोज सोसायटी, बी टी कवडे रोड, घोरपडी) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तन्वीर नासीर जोड Tanveer Nasir Jod (रा. लोहगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार लोहगाव येथील स. नं. २६१ हिस्सा नं. १/१ यातील १० आर मिळकतीवर १० फेब्रुवारी २०२६ पूर्वी घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरसेविका हिमाली कांबळे आणि अफसर सय्यद यांच्या मालकीचा लोहगाव येथे १० गुंठे प्लॉट आहे. त्या प्लॉटला त्यांनी तारेचे कंपाऊंड घातले आहे. त्यांच्या या जागेपैकी जवळपास साडेचार गुंठे जमिनीवरील सिमेंटच्या तारेचे कंपाऊंड आरोपीने काढून टाकले. त्या ठिकाणी पत्र्याचे कंपाऊंड करुन तेथे स्वत:च्या नावाचा बोर्ड लावला. कंपाऊंड तोडून अंदाजे १५ ते २० हजार रुपयांचे नुकसान केले आहे. फिर्यादी यांना याची माहिती मिळाल्यावर त्या जागेवर गेल्या. तेव्हा त्याने तुम्ही येथे यायचे नाही, असे आरोपी त्यांना म्हणाला. तसेच त्यांचा मामा यांना ‘‘तुझा काय संबंध तो प्लॉट माझा आहे, तु या ठिकाणी परत आला तर तुला मारुन टाकीन, ’’ अशी धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे तपास करीत आहेत.
