Pune Crime News | कॉकरोच जनता पार्टीच्या गुरुवारच्या आंदोलनाचे पोलीस दलाकडून होणार  मिनिट टू मिनिट  व्हिडिओ चित्रिकरण; किमान 21 व्हिडिओ कॅमेर्‍यांद्वारे संपूर्ण परिसराच्या चित्रीकरणाची तयारी, प्रथमच अशी डिजिटल तयारी

Amitesh Kumar

पुणे : Pune Crime News | कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्ली नंतर पुण्यात होणार्‍या आंदोलनात बंदोबस्ताची शहर पोलीस दलाने मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. त्याचबरोबर या आंदोलनाच्या काळात कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच कोणतीही घटना चुकू नये, यासाठी आंदोलनाच्या परिसरातील सर्व बाजूंचे चित्रिकरणासाठी स्वतंत्र व्हिडिओ कॅमेरे ठेवण्यात येणार आहे. अशा प्रकारे शहरातील विविध पोलीस ठाण्यातील व्हिडिओ कॅमेरे व पोलीस अंमलदार यांना आंदोलनाच्या ठिकाणी एकत्रित बंदोबस्तावर बोलविण्याची ही पहिलीच वेळ असावी. सोशल मीडियातून पुढे आलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची पोलिसांनीही प्रथम इतक्या मोठ्या प्रमाणावर डिजिटल बंदोबस्ताची तयारी केली आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी ११ जून रोजी दुपारी ४ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात आंदोलन करण्यात येणार आहे. दिल्ली नंतर कॉकरोच जनता पार्टीचे हे पुण्यातील दुसरेच आंदोलन आहे. पुण्यात स्पर्धा परीक्षा तसेच विविध परीक्षांसाठी अभ्यास करण्यासाठी मोठ्या संख्येने तरुणतरुणी येत असतात. त्यामुळे या तरुण तरुणींचा या आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. किमान ३ ते ४ हजार तरुण या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्यादृष्टीने या तरुणाईवर लक्ष ठेवण्यासाठी शहरातील विविध पोलीस ठाणे, वाहतूक शाखा यांच्याकडील व्हिडिओ कॅमेरामन अशा २१ जणांची या आंदोलनाच्या चित्रिकरणासाठी विशेष नेमणूक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत यांनी सांगितले की, कॉकरोच जनता पार्टीचे उद्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारात आंदोलन आहे. या आंदोलनाच्या बंदोबस्ताची तयारी करण्यात येत आहे. त्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी व्हिडिओ चित्रिकरण करण्यात येणार आहे.

You may have missed