Pune Crime News | काय सांगता ! 1934 सालच्या फाळणी नमुन्यात स्वतंत्र सर्वे नंबर नसताना खरेदी, विक्री व्यवहार करुन 1967 साली बनावट दस्त नोंदणी केल्याचा प्रकार 58 वर्षांनी उघडकीस

Crime

पुणे : Pune Crime News | इंग्रजाच्या काळात १९३४ मधील फाळणी नमुना मध्ये वाघोली येथील स. नं. ३२२चे पोट हिस्से पडलेले होते. त्यात स्वतंत्र सं. नं. ३२२/४ असा कोणताही पोटहिस्सा भूगोलावर व दप्तरी अस्तित्वात नाही, हे माहिती असताना १९६८ साली खरेदी विक्री व्यवहार करुन त्याची सह दुय्यम निबंधक कार्यालयाची दिशाभूल करुन दस्त नोंदणी करण्यात आल्याचा प्रकार तब्बल ५८ वर्षांनी उघडकीस आला आहे. ५८ वर्षापूर्वी शासनाची फसवणूक करुन दस्ताची नोंदणी केल्याचा गुन्हा आता दाखल करण्यात आला आहे.

याबाबत हवेली वर्ग २ सह दुय्यम निंबंधक कार्यालयातील प्रभारी अधिकारी ऋषिकेश देवानंद सनके (वय २८) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन दस्त लिहून देणारे इस्माईल अब्दुल पठाण, मकबुल अब्दुल पठाण, रमजान महंमद पठाण आणि दस्त लिहून घेणारे सल्लाउद्दीन कासम पठाण (रा. वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निसार रफिक पठाण (रा. गंज पेठ) यांनी सह दुय्यम निबंधक कार्यालयात तक्रार अर्ज केला. त्यांनी केलेले अर्ज व इतर कागदपत्रे, सुनावणीचे कागदपत्रे व अहवाल याचे अवलोकन करण्यात आले. इस्माईल अब्दुल पठाण, मकबुल पठाण, रमजान पठाण यांनी लिहून देणार म्हणून व लिहून घेणार सल्लाउद्दीन पठाण यांनी आप आपसात संगनमत करुन वाघोली स. नं. ३२ चे सन १९३२ साली झालेल्या फाळणीबाराचा अंमल फे. नं. १८९५ नुसार दि़ २५ ऑक्टोंबर १९३४ नुसार पोट हिस्से स. नं. ३२२/१, ३२२/२अ३, ३२२/३अ, ४अ आणि ३२२/४ ब असे तयार झालेले आहेत. परंतु, स्वतंत्र स. नं. ३२२/४ असा कोणताही पोटहिस्सा भूगोलावर व दप्तरी अस्तित्वात नसताना देखील लिहून देणार व लिहून घेणार यांनी स. नं. ३२२/४ या मिळकतीबाबत व्यवहार केल्याबाबतचा दस्त बोगस बनावट कागदपत्रांचे आधारे नोंदविलेला आहे.

हा दस्त रद्द करण्याकामी तसेच फौजदार गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार अर्जात नमूद केले आहे. तक्रारदार हे एकाचे वारसदार आहेत. त्यांनी आपल्या पूर्वजांची कागदपत्रे तपासली. तेव्हा त्यांना हा प्रकार समजला. त्यांच्या अर्जाची चौकशी करण्यात आली. त्यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले. यावर सुनावणी घेण्यात आली. निसार रफिक पठाण यांनी कार्यालयात हजर राहून त्यांचे म्हणणे सादर केले. १९३४ च्या अधिकृत फाळणीबारानुसार स्वतंत्र स. नं. ३२२/४ असा कोणताही पोटहिस्सा अस्तित्वात नाही़, याबाबतचे पुरावा म्हणून मंडळ अधिकारी वाघोली, तसेच लोणी काळभोरचे अपर तहसिलदार यांनी दिलेल्या माहिती सादर केली. वाघोली येथील कार्यालयाच्या अभिलेखातील खरेदीखत ४७०३/१९६८ चे अवलोकन केले असता, त्यामध्ये लिहून देणार व लिहून घेणार यांनी आप आपसात संगनमत करुन तत्कालीन सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक १ यांची दिशाभूल करुन खोटी माहिती व कागदपत्रे सादर करुन स्वत:चे आर्थिक फायद्या करीता २६ डिसेंबर १९६८ रोजी दस्ताची नोंदणी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९६८ मध्ये दस्त करणार्‍या चौघांना शोधण्याचे काम खडक पोलिसांवर आले आहे. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील बनकर तपास करीत आहेत.

You may have missed