Pune Crime News | आय टी मधील प्रेमविवाह झालेल्या महिलेचा मुल होत नसल्याने छळ; विवाहितेने इमारतीवरुन उडी मारुन संपविले आपले जीवन, पती, सासुवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | माहिती तंत्रज्ञान (आय टी) क्षेत्रात दोघेही कार्यरत असताना त्यांचे प्रेम जुळले, त्यांनी प्रेमविवाह केला. परंतु, मुल होत नसल्याच्या कारणावरुन तिचा छळ होऊ लागला, या छळाला कंटाळून या विवाहितेने राहत्या इमारतीवरुन उडी मारुन आपले जीवन संपविले.
दिप्ती प्रदीप एकशिंगे (वय २७, रा. माणिकबाग, सिंहगड रोड) असे विवाहितेचे नाव आहे. सिंहगड रोड पोलिसांनी पती प्रदीप विठ्ठल एकशिंगे (Pradeep Vitthal Ekshinge) आणि सासु सुरेखा विठ्ठल एकशिंगे Surekha Vitthal Ekshinge (दोघे रा. माणिकबाग, सिंहगड रोड) व त्यांच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दीप्ती हिचे भाऊ डॉ. किरण तुषार दुधबळे (वय ३०, रा. गडचिरोली) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदिप आणि दीप्ती हे दोघे आय टी क्षेत्रात कामाला होते. त्यातून त्यांचे प्रेम जुळले. त्यांनी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेमविवाह केला. लग्नानंतर काही काळाने दीप्ती हिने नोकरी सोडली होती. तिच्या सासुला नातवाचे तोंड पाहण्याची खूप घाई झाली होती. पती, सासु व त्यांचे नातेवाईक हे लग्न झाल्यापासून मुल होत नाही, तसेच क्षुल्लक कारणावरुन मारहाण करुन मानसिक छळ करत होते. या छळाला कंटाळून १७ जून रोजी दीप्ती हिने राहत्या घराच्या इमारतीवरुन उडी मारुन आपले जीवन संपविले. सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार आडगळे तपास करीत आहेत.
