Pune Crime News | प्रेमसंबंधावरुन युवकावर सपासप वार करुन निर्घुण खुन; चंदननगर पोलिसांनी 5 जणांना केली अटक
पुणे : प्रेमसंबंधाबाबत विचारणा केल्याच्या रागातून ८ ते ९ जणांच्या टोळक्याने १८ वर्षाच्या युवकावर हत्याराने सपासप वार करुन त्याचा निर्घुण खुन करण्यात आला. चंदननगर पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
लखन बाळू सकट (वय १८, रा. आंबेडकर वसाहत, चंदननगर) असे खुन झालेल्या युवकाचे नाव आहे. प्रथमेश शंकर दारकू Prathamesh Shankar Darku (वय २०, रा. बोराटे वस्ती, चंदननगर), यश रवींद्र गायकवाड Yash Ravindra Gaikwad (वय १९, रा. बोराटे वस्ती, चंदननगर), जानकीराम परशराम वाघमारे Jankiram Parshram Waghmare (वय १८, रा. बोराटे वस्ती, चंदननगर), महादेव पांडुरंग गंगासागरे Mahadev Pandurang Gangasagre (वय १९, रा. बोराटे वस्ती, चंदननगर), बालाजी आनंद पेदापूरे Balaji Anand Pedapure (वय १९, रा. बोराटे वस्ती, चंदननगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना चंदननगरमधील जुना मुंढवा रोडवरील ऑक्सिजन पार्क येथे शनिवारी सायंकाळी ७ वाजता घडली.
याबाबत लखन सकट याचे चुलते केशव बबन वाघमारे (वय ३२, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या अनुषंगाने लखन सकट याने यश गायकवाड याला विचारणा केली होती. यावरुन त्यांच्यात भांडणे झाली होती. त्यानंतर शनिवारी यश गायकवाड याने लखन सकट याला ऑक्सिजन पार्क येथे बोलावून घेतले. तेथे लखन आल्यानंतर यश गायकवाड याने त्या मुलीशी तुझा काय संबंध तु का मध्ये पडतो, अशी विचारणा केली. त्यावरुन त्यांच्यात पुन्हा वाद झाला. तेव्हा ८ ते ९ जणांच्या टोळक्याने त्याला लाथाबुक्क्यांनी व धारदार हत्याराने वार करुन जीवे ठार मारले.
या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी शवविच्छेदनासाठी लखन सकट याचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला. खुनामागील कारणाचा शोध घेऊन रात्रीत पाच जणांना अटक केली. त्यांच्या आणखी २ ते ३ साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.
