Pune Daund Crime News | दौंडमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी आणि भ्रूणहत्येचे रॅकेट उघड; दोन आरोपी अटकेत, 500 गर्भपातांचा संशय
पुणे : Pune Daund Crime News | दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी आणि भ्रूणहत्येचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोन प्रमुख आरोपींना अटक केली असून, गेल्या दोन वर्षांत सुमारे ५०० बेकायदेशीर गर्भपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, केडगाव परिसरातील एका घरामध्ये अत्यंत गुप्तपणे गर्भलिंग तपासणी आणि बेकायदेशीर गर्भपात केले जात होते. यासाठी पोर्टेबल सोनोग्राफी मशीनचा वापर करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. ३५ ते ५० हजार रुपयांच्या मोबदल्यात हा प्रकार सुरू असल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत बोगस डॉक्टर अण्णासाहेब गिरी याला २० मे रोजी केडगाव परिसरातून अटक केली. त्यानंतर चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे २४ मे रोजी वाघोली परिसरातून डॉक्टर जाधव यालाही ताब्यात घेण्यात आले.
दोन्ही आरोपींना दौंड न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, दोन्ही आरोपींविरोधात PCPNDT कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हे प्रकरण केवळ दोन व्यक्तींपुरते मर्यादित नसून यामागे मोठे संघटित रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता आहे. या प्रकरणात दलाल, एजंट तसेच काही नामांकित डॉक्टरांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, तपासाच्या अनुषंगाने आणखी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्रकरणामुळे मुलींच्या जन्मापूर्वीच त्यांचे अस्तित्व संपवण्याच्या अमानुष प्रकाराविरोधात संताप व्यक्त केला जात असून, संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
