Pune Festival 2026 | 38 व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये सूफी संगीताचा भव्य सोहळा संपन्न (Video)

Pune Festival 2026 | Grand Sufi music concert concludes at the 38th Pune Festival.

Pune Festival 2026 | पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणाऱ्या ३८ व्या पुणे फेस्टिव्हल च्या निमित्ताने शनिवारी १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ‘सूफी संगीत’ या विशेष कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नामांकित सूफी गायकांनी आणि कलाकारांनी एकापेक्षा एक सरस कव्वाली, भजन आणि सूफी गीते सादर करून उपस्थित रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

https://www.instagram.com/p/DdgMs02pYdJ

भर दे झोली, हमारा प्यारा हिंदुस्तान, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिये , मैं तो प्रेम दीवानी मेरा दर्द ना जाने कोई, सांसो की माला पे, तुम्हे दिल्लगी, आओगे जब तुम ओ सजना, काली काली जुल्फे ही कुत्बी ब्रदर्स ने सादर केलेल्या कव्वाली, भजने व गीते यांना रसिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

याचे सूत्रसंचालन डॉ. अब्दुल हमीद इनामदार आणि डॉ. अजमत दलाल यांनी केले. या कार्यक्रमात हाजी मोहम्मद इद्रीस (मुख्य गायक), अर्शद कुतबी (सह-गायक), अदनान  कुतबी    (सह-गायक), रशीद अली (तबला), अबरार अहमद,  (ढोलक), नासिर अहमद (बेंजो), इम्रान (कोरस / सह-गायक), नदीम (कोरस / सह-गायक), बबलू* (ऑक्टोपॅड) यांचा सहभाग होता.

या भक्तिमय आणि संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन एम. सी. ई. सोसायटीची डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटी, पुणे आणि मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने, पुणे फेस्टिव्हल यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून माजी आमदार अ‍ॅड. हुस्नाबानू खलिफे या उपस्थित होत्या. डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटीच्या कुलपती आबेदा इनामदार, कुलगुरू सुनील कुमार, पुणे फेस्टिव्हलच्या चेरपर्सन मीरा सुरेश कलमाडी, पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष तन्वीर इनामदार, उपाध्यक्ष अॅड. अयुब शेख, आदी मान्यवर उपस्थित होते.

आयोजकांच्या वतीने प्रमुख पाहुण्या अ‍ॅड. हुस्नाबानू खलिफे यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात अ‍ॅड. हुस्नाबानू खलिफे म्हणाल्या, ‘सूफी संगीत’ हे केवळ मनोरंजन नसून ते मनाला शांतता देणारे आणि ईश्वरभक्तीशी जोडणारे एक माध्यम आहे. पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून सर्वधर्मसमभावाचा आणि संस्कृतीचा हा संदेश देणे कौतुकास्पद आहे’ असे त्यांनी प्रतिपादन केले.

कलाकारांच्या सुरेल ताना आणि भक्तिमय वातावरणाने गणेश कला क्रीडा रंगमंच टाळ्यांच्या गजर आणि दाद देणाऱ्या आवाजांनी दुमदुमून गेले.

पुण्यातील संगीतप्रेमी आणि रसिकांनी या कार्यक्रमाला तुफान गर्दी केली होती. संपूर्ण सभागृह प्रेक्षकांनी तुडुंब भरले होते. उपस्थितांनी या अविस्मरणीय सूफी संगीताच्या अनुभवाची मनापासून प्रशंसा केली.