Pune Festival 2026 | पुणे फेस्टिव्हलमध्ये हिंदी हास्य कवी संमेलन रंगले; उपहास, उपरोध आणि विनोदाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

Pune Festival 2026 | Hindi Humorous Poets' Gathering Enthralls at Pune Festival; Audience Enthusiastically Appreciates Satire, Irony, and Humor.

पुणे : Pune Festival 2026 | समाजातील विसंगती, दैनंदिन जीवनातील गमतीजमती, राजकीय आणि सामाजिक वास्तवावर उपरोध तसेच शाब्दिक कोट्यांच्या माध्यमातून भाष्य करणाऱ्या कवितांनी पुणे फेस्टिव्हलमधील हिंदी हास्य कवी संमेलन रंगले. हलक्याफुलक्या शैलीतील कविता, किस्से आणि विनोदी प्रसंगांना रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.

पुणे फेस्टिव्हलअंतर्गत रविवारी सायंकाळी गणेश कला क्रीडा मंच येथे या हिंदी हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

या संमेलनात राजस्थानचे ज्येष्ठ कवी जगदीश सोलंकी, कवी बुद्धीप्रकाश, लखनौचे डॉ. सर्वेश आस्थाना, हरियाणाचे अरुण जेमिनी, पुण्याचे दिलीप शर्मा आणि प्रतापगढच्या कवयित्री साक्षी तिवारी यांनी आपल्या कविता सादर केल्या. त्यांच्या हास्य, उपरोध, प्रेम, देशप्रेम आणि सामाजिक भाष्याने मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक ॲड. अभय छाजेड, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई यांच्या हस्ते सहभागी कवींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कृष्णकुमार गोयल म्हणाले की, पुणे हे दर्जेदार साहित्य आणि कलेला मनापासून दाद देणारे शहर आहे. सध्याच्या तणावपूर्ण जीवनशैलीत हास्याचे महत्त्व अधिक वाढले असून, अशा कार्यक्रमांमुळे रसिकांच्या चेहऱ्यावर आणि मनातही आनंद फुलतो.

कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक न्याती ग्रुपचे अध्यक्ष नितीन न्याती, प्राईड ग्रुपचे प्रमुख अरविंद जैन आणि कोहिनूर ग्रुपचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक विनीत गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. द्वारका जालान यांनी कवी संमेलनाचे सूत्रसंचालन केले.

कवयित्री साक्षी तिवारी यांनी सरस्वतीस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर कवी बुद्धीप्रकाश यांनी जीवनातील वास्तव आणि विसंगतींवर उपरोधिक शैलीत भाष्य करणारी कविता सादर केली.

साक्षी तिवारी यांनी प्रेम, नातेसंबंध आणि भावनिक गुंतागुंत यांवर हलक्या विनोदी आणि उपरोधिक शैलीतील कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली.

पुण्याचे कवी दिलीप शर्मा यांनी प्रसिद्ध हिंदी गीतांच्या चालीवर राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे विडंबनकाव्य सादर केले. त्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

डॉ. सर्वेश आस्थाना यांच्या कवितांमधून हास्याबरोबरच देशप्रेमाची भावना व्यक्त झाली. भारताची माती, संस्कृती आणि देशाशी असलेले नाते त्यांनी प्रभावी शब्दांत मांडले.

अरुण जेमिनी यांनी कारगिल युद्धातील जखमी सैनिकाच्या संदर्भातील कल्पक विनोदी प्रसंग सादर केला. विविध क्षेत्रांतील व्यक्तींचे रक्त सैनिकाला दिल्यानंतर त्याची भाषा आणि वागणूक कशी बदलते, या कल्पनेतून त्यांनी गंभीर आशय विनोदी पद्धतीने मांडला.

संमेलनाची सांगता ज्येष्ठ कवी जगदीश सोलंकी यांच्या गाजलेल्या ‘तिरंगा’ या कवितेने झाली. सैनिकांचे धैर्य आणि देशप्रेम यांचा उल्लेख करत त्यांनी जीवनातील छोट्या अडचणींमुळे निराश न होण्याचा संदेश दिला.

हास्य, उपहास, देशप्रेम आणि सामाजिक भाष्याचा अनोखा संगम असलेल्या या कवी संमेलनाला मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.

You may have missed