Pune Festival | 38 व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये 21 सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी; रसिकांसाठी सर्व कार्यक्रम विनामूल्य
पुणे: Pune Festival | कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत, साहित्य आणि रंगभूमीचा सुरेख संगम असलेल्या 38 व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये यंदा तब्बल 21 सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
हे कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार असून, सर्व कार्यक्रम रसिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य असतील.
पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, जनरल सेक्रेटरी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, तसेच विश्वस्त मोहन टिल्लू यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
बालगंधर्व रंगमंदिरात 14 तर यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात 7 कार्यक्रम होणार आहेत.
बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रम
18 सप्टेंबर, रात्री 9 – ‘आशा-सुमन’
नितीन कुलकर्णी यांच्या संयोजनातून ‘व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिव्हल’मधील विजेते कलाकार हा कार्यक्रम सादर करतील.
19 सप्टेंबर – ‘उगवते तारे’ आणि ‘इंद्रधनू’
6 ते 14 वर्षे आणि 15 ते 25 वर्षे वयोगटातील कलाकारांसाठी हे दोन कार्यक्रम असतील. पुणे शहर व ग्रामीण भागातील 37 शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील 700 हून अधिक कलाकार विविध नृत्यप्रकार सादर करतील.
19 सप्टेंबर, रात्री 9 – मराठी कवी संमेलन
ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे सूत्रसंचालन करणार असून महाराष्ट्रातील नामवंत कवी सहभागी होतील.
20 सप्टेंबर, सकाळी 9.30 – ‘व्हॉईस ऑफ पुणे’
200 हून अधिक गायक-गायिका सहभागी होतील. ओ. पी. नय्यर, आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांची गीते सादर केली जातील.
20 सप्टेंबर, दुपारी 4 – ‘कावेरी परंपरा’
शास्त्रीय गायन, वादन आणि नृत्याचा कार्यक्रम. शमा भाटे, आनंद भाटे आणि भारत कामत प्रमुख पाहुणे असतील.
20 सप्टेंबर, रात्री 9 – ‘भारती कॉयरा वीरा’
आठ गायक आणि दहा विद्यार्थी वादक मराठी व हिंदी गीते कॉयर स्वरूपात सादर करतील.
21 सप्टेंबर, दुपारी 12 – ‘महाराष्ट्राची लोकधारा’ लावणी महोत्सव
नमिता पाटील, अर्चना जावळेकर, माया खुटेगावकर आणि प्राची मुंबईकर यांच्यासह कलाकारांचा बहारदार लावणी आविष्कार पाहायला मिळेल.
21 सप्टेंबर, सायंकाळी 5 – ‘सत्यशोधक महात्मा’
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित नाटक सादर होईल. रामनाथ चव्हाण लिखित या नाटकाचे दिग्दर्शन योगेश सोमण यांनी केले आहे.
21 सप्टेंबर, रात्री 9 – ‘जयहिंद’
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या वाद्यवृंदातील विस्मृतीत गेलेल्या गीतांचा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे.
22 सप्टेंबर, सायंकाळी 5 – ‘स्वरसम्राज्ञी’
चारुदत्त आफळे आणि त्यांचा संघ संगीत नाटक सादर करणार आहे.
22 सप्टेंबर, रात्री 9 – ‘चौथी सिगरेट’
लेखकांच्या जीवनावर आधारित हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
23 सप्टेंबर, दुपारी 3 – ‘मिस पुणे फेस्टिव्हल’
18 ते 25 वयोगटातील अविवाहित तरुणींसाठी आयोजित व्यक्तिमत्त्व स्पर्धेत 70 जणींपैकी 15 अंतिम स्पर्धकांची निवड झाली आहे.
23 सप्टेंबर, रात्री 9 – ‘शिवराज्य – एका नव्या युगाची सुरुवात’
ओम डान्स अकॅडमीचे 90 विद्यार्थी कलाकार 12 नृत्यरचनांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, अभिनय, संवाद, संगीत आणि नृत्याद्वारे सादर करतील.
24 सप्टेंबर, सायंकाळी 5 – ‘स्वरयात्रा’
खंडेराव मुळे अभंग, भक्तिगीते, भावगीते आणि गझल यांच्या माध्यमातून भक्ती, संस्कार, भावना, संघर्ष, आशा आणि आत्मचिंतनाचा प्रवास सादर करतील.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील कार्यक्रम
21 सप्टेंबर, रात्री 9 – ‘बेमिसाल रफी’
अली आणि सायरा हुसेन मोहम्मद रफी यांच्या गीतांचा कार्यक्रम सादर करतील.
22 सप्टेंबर, सायंकाळी 5 – ‘आशा भोसले – जीवन संगीत’
आशा भोसले यांच्या जीवन आणि संगीतावर आधारित विशेष दृकश्राव्य कार्यक्रम सादर होईल.
22 सप्टेंबर, रात्री 9 – ‘द सुपरस्टार’
देवानंद, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्यावर चित्रित लोकप्रिय गाण्यांचा कार्यक्रम असेल.
23 सप्टेंबर, सायंकाळी 5 – ‘नमामि शंभो’
शेखर केंदळे आणि त्यांचा समूह तालवाद्यांच्या साथीने भक्तिगीते सादर करणार आहे.
23 सप्टेंबर, रात्री 9 – ‘संभवामि युगे युगे’
भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारित गीत, नृत्य आणि संगीताचा कार्यक्रम संस्कृती बालगुडे यांच्या संकल्पनेतून सादर होणार आहे.
24 सप्टेंबर, सायंकाळी 5 – ‘आविष्कार भारती’
भारती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे 120 कलाकार 10 समूहांतून कथक, भरतनाट्यम, सत्रिय, मोहिनीअट्टम, कुचिपुडी आणि सृजनात्मक नृत्यरचना सादर करतील.
पुणे फेस्टिव्हल आयोजकांनी पुणेकर आणि रसिकांना या 21 विनामूल्य सांस्कृतिक कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
