Pune PMC News | नवजात बालकांसाठी महापालिका रुग्णालयांत ४ कोटींची यंत्रसामग्री
10 व्हेंटिलेटर, 10 सीपीएपी मशीनची तातडीने खरेदीचा मार्ग मोकळा – श्रीनाथ भिमाले
पुणे : Pune PMC News | महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय, राजीव गांधी रुग्णालय आणि चंदुमामा सोनवणे प्रसूतिगृहातील नवजात अतिदक्षता विभागांसाठी (एनआयसीयू) १० नवीन व्हेंटिलेटर आणि १० सीपीएपी मशीन खरेदी करण्यात येणार आहेत. या यंत्रसामग्रीसाठी तब्बल ३ कोटी ९८ लाख ५० हजार रुपयांचा खर्चाला मंजूरी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्थायी समितीसमोर ठेवला होता. प्रस्तावाला मान्यात दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
महापालिका रुग्णालयांमध्ये नवजात बालकांसाठी आवश्यक असलेल्या व्हेंटिलेटरची कमतरता असल्याने गंभीर अवस्थेतील बालकांना अनेकदा ससून रुग्णालयात संदर्भित करावे लागते. त्यामुळे पालक आणि नातेवाईकांची धावपळ होण्याबरोबरच महापालिका रुग्णालयांच्या सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली जाते. खासगी रुग्णालयांमधील उपचाराचा वाढता खर्च लक्षात घेता महापालिका रुग्णालयांमध्येच अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज प्रशासनाने प्रस्तावात व्यक्त केली होती.
कमला नेहरू रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी दोन्ही प्रकारच्या यंत्रांची मागणी केली आहे. मात्र, निविदा काढून खरेदी प्रक्रिया राबविल्यास सुमारे एक महिन्याचा कालावधी लागू शकतो. नवजात बालकांच्या उपचाराची तातडीची गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ६७(३)(क) अंतर्गत निविदा प्रक्रिया न राबविता थेट कोटेशनच्या आधारे खरेदी करण्याचे प्रशासनाने प्रस्तावित केले आहे.
सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पातील उपकरणे व यंत्रसामग्रीसाठीच्या १० कोटी रुपयांच्या तरतुदीतून ३ कोटी ९८ लाख ५० हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यासाठी करारनामा करून देयके अदा करण्यास स्थायी समितीची मंजुरी मागण्यात आली आहे.
