Pune PMC News | पावसाळी गटारांच्या सफाईतील ‘गोलमाल’ अतिरिक्त आयुक्तांकडून उघड; चेंबर्स साफ परंतू नलिका खचाखच गाळाने भरलेल्या

Pune PMC News

दहा दिवसांत गटारांची परिपूर्ण सफाई न झाल्यास ठेकेदारांवर गुन्हा दाखल करून ब्लॅकलिस्ट करणार; अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर यांचा इशारा

पुणे : Pune PMC News | पावसाळी गटारांच्या सफाईतील ठेकेदारांचा ‘गोलमाल’ अतिरिक्त आयुक्तांनीच उघडकीस आणला. रोबोटीक कॅमेर्‍यांद्वारे क्रॉनीक स्पॉटवरील ७०० हून अधिक चेंबरर्समधील दोन्ही बाजूंच्या गटारांमध्ये (नलिका) दहा मीटरपर्यंत जावून रेकॉर्डींग केल्यानंतर निम्म्याहून अधिक चेंबर्सला जोडणार्‍या नलिका गाळानेच खचाखच भरल्याचे उघडकीस आले. पुढील दहा दिवसांत गटारांची व्यवस्थीत सफाई न केल्यास ठेकेदारांवर गुन्हे दाखल करुन ब्लॅकलिस्ट करण्याचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर यांनी दिली.

अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर आणि प्रजीत नायर यांनी मगळवारी पावसाळ्याच्या पार्श्‍वभुमीवर नालेसफाई आणि पावसाळी गटारांच्या सफाईच्या कामांचा आढावा घेतला. वरिष्ठ अधिकारी स्तरावर प्रथमच नाले सफाईची कामे करणार्‍या ठेकेदारांना बैठकीस पाचारण करण्यात आले होते. कागदावर ९५ टक्के कामे झाल्याचा दावा ठेकेदार व अधिकार्‍यांकडून करण्यात येत होता. दरम्यान, अतिरिक्त आयुक्तांनी सफाईच्या कामांची तपासणी करण्यासाठी रोबोटीक कॅमेर्‍यांची मदत घेतली. याअंतर्गत पावसाळ्यात पाणी साठणार्‍या भागातील पावसाळी गटारांवरील चेंबर्सची तपासणी करण्यात आली. शहरात सुमारे पाच हजारांहून अधिक चेंबर्स आहेत, त्यापैकी ७०० चेंबर्सची तपासणी करण्यात आली. या चेंबर्समधील गाळा काढण्यात आला आहे. या चेंबर्सला जोडणार्‍या दोन्ही बाजूंच्या नलिकांमध्ये दहा मीटरपर्यंत रोबोटीक कॅमेरा सोडण्यात आला. यामध्ये निम्म्याहून अधिक चेंबर्सला जोडणार्‍या नलिकां तशाच गाळाने भरलेल्याचे निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

पुढील दहा दिवसांत सर्व पावसाळी गटारे गाळमुक्त झाली पाहीजेत. गटारांमध्ये गाळ आढळल्यास संबधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात येणार असल्याचे ठेकेदारांना सांगण्यात आल्याची माहिती पवनीत कौर यांनी दिली. यंदा प्रथमच झोनल उपायुक्तांच्या मार्फत सफाईच्या कामाच्या निविदा राबविण्यात आल्या आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निविदांना मान्यता देण्यास विलंब होउ नये म्हणून कमी दराच्या निविदा आलेल्या ठेकेदारांना काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या गुरूवारी होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीत निविदा मंजुर होतील, असा विश्‍वासही कौर यांनी व्यक्त केला.

You may have missed