Pune PMC News | नायडू जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठ्यासाठी 56 कोटींच्या कामाला मंजुरी – श्रीनाथ भिमाले
पुणे : Pune PMC News | जायका प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या १२७ एमएलडी क्षमतेच्या नायडू मैलापाणी शुद्धीकरण केंद्राला महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून (महावितरण) वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी ५६ कोटी १७ लाख रुपयांच्या कामाला पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
नायडू मैलापाणी शुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाने उच्चदाब (एचटी) केबल, रिंग मेन युनिट (आरएमयू), मीटरिंग किऑस्क, केबल खोदाई, अर्थिंग, अर्थिंग स्ट्रिप आणि केबल जॉईंट आदी कामांचा समावेश असलेले पूर्वगणनपत्रक तयार केले होते. या कामासाठी ६ कोटी २४ लाख १४ हजार ८११ रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.
महापालिकेच्या जायका प्रकल्पांतर्गत ११ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यापैकी नायडू केंद्राला वीजपुरवठा उपलब्ध झाल्यानंतर केंद्राच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक विद्युत सुविधा निर्माण होणार आहेत. या कामामुळे मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.
निविदा अटी व मान्य तांत्रिक तपशीलानुसार काम करून घेण्याची जबाबदारी संबंधित विभागाची राहणार आहे. ठेकेदाराकडून अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम आणि हमीपत्र जमा करण्यात आले असून, कामाच्या गुणवत्तेची दक्षता घेण्यात येणार असल्याचे विषयपत्रात नमूद करण्यात आले आहे.
