Pune PMC News | महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ‘इको बाप्पा’ उपक्रम – श्रीनाथ भिमाले

Shrinath Bhimale

दोन विद्यार्थ्यांसाठी कागदी लगदा आणि शाडू मातीपासून गणेशमूर्ती; स्थायी समितीची प्रस्तावाला मान्यता

पुणे: Pune PMC News | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘रंगवा इको बाप्पा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या हातकागद संस्था, पुणे उत्पादन विभागामार्फत हा उपक्रम राबविण्यात येणार असून, दोन हजार विद्यार्थ्यांसाठी निसर्गपूरक गणेशमूर्ती संच खरेदी करण्यासाठी २५ लाख रुपयांचा खर्च करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्थायी समितीसमोर ठेवल्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

प्रशासनाच्या प्रस्तावात दीड हजार विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविण्याची मागणी केली होती. या प्रस्तावाला नगरसेविका रुपाली धाडवे यांनी दीड हजार ऐवजी दोन हजार विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविण्याच्या उपसूचना दिली. त्यास मान्यता देण्यात आली.

कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या तसेच शाडू मातीचे मिश्रण असलेल्या सात इंची गणेशमूर्ती, सहा रंग, दोन ब्रश, पॅकिंग आणि संचाची माहितीपत्रिका असा प्रत्येक संच असणार आहे. मध्यवर्ती भांडार खरेदी समितीने ११ जून २०२६ रोजी निश्चित केलेल्या दरानुसार एका संचाची किंमत १४०० रुपये आहे. त्यानुसार १५०० संचांसाठी २१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती रंगविण्याचा अनुभव देण्यात येणार आहे. गणेशोत्सवात पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर वाढविणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या हातकागद संस्थेने उत्पादित केलेल्या विविध वस्तूंना राज्य शासनाने प्रोत्साहन दिले आहे. हातकागदापासून तयार होणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी दर निश्चित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्याच दरपत्रकात सात इंची निसर्गपूरक गणपती संचासाठी १४०० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.

या खर्चासाठी महापालिकेच्या सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकातील ‘शैक्षणिक उपक्रम’ या अर्थशीर्षकाखालील २ कोटी ५० लाख रुपयांच्या तरतुदीतून रक्कम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यापैकी २५ लाख रुपये या उपक्रमासाठी खर्च करण्याचा प्रस्ताव आहे.

You may have missed