Pune PMC News | महापौरांसह महापालिकेचे दोन अधिकारी जपान दौऱ्यावर ! ओकायामा परिषदेसाठी 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान दौरा
पुणे : Pune PMC News | पुणे-ओकायामा मैत्री व सहकार्य कराराच्या २०व्या वर्धापन दिनानिमित्त जपानमधील ओकायामा येथे आयोजित करण्यात आलेल्या परिषदेस महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर आणि शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर उपस्थित राहणार आहेत. २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या दौऱ्यास स्थायी समितीने मंजुरी दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
या दौऱ्यासाठी प्रति अधिकारी सुमारे तीन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. विमान प्रवास, निवास आणि भोजनाचा खर्च महापालिकेकडून करण्यात येणार असून, दोन्ही अधिकाऱ्यांच्या दौऱ्यासाठी सुमारे सहा लाख रुपये खर्च होणार आहेत. हा खर्च सन २०२६-२७च्या अंदाजपत्रकातील सामान्य प्रशासन विभागाच्या ‘विविध समित्या, आयोग व दौऱ्यासाठी’ या अर्थशीर्षकातून करण्यात येणार आहे. या अर्थशीर्षकावर सध्या १० लाख रुपयांची तरतूद उपलब्ध आहे.
पुणे महापालिका आणि जपानच्या ओकायामा प्रीफेक्चरल गव्हर्नमेंट यांच्यात १९ जानेवारी २००६ रोजी मैत्री व सहकार्य करार झाला. या कराराला यंदा २० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर ओकायामा येथे परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत ओकायामा प्रीफेक्चरल गव्हर्नमेंट, स्थानिक प्रशासन, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि अन्य संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींशी पुणे महापालिकेचे अधिकारी चर्चा करणार आहेत.
शहरी प्रशासन, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, उद्योग, तंत्रज्ञान, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रांत भविष्यातील सहकार्याच्या संधींचा आढावा या भेटीत घेतला जाणार आहे. विद्यमान सहकार्याला अधिक बळकटी देण्याबरोबरच विविध क्षेत्रांतील ज्ञान आणि अनुभवांची देवाणघेवाण करून प्रत्यक्ष उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने चर्चा केली जाणार असल्याचे प्रशासनाने प्रस्तावात नमूद केले आहे.
दरम्यान, जानेवारी २०२६मध्ये ओकायामा प्रीफेक्चरल गव्हर्नमेंटचे १५ सदस्यीय शिष्टमंडळ पुणे महापालिकेत आले होते. ओकायामा चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रतिनिधींचाही या शिष्टमंडळात समावेश होता. ओकायामा विधानसभेचे अध्यक्ष केनिची शिंपो आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष हिरोयुकी ओगुरा यांच्या नेतृत्वाखाली ही भेट झाली होती.
या वेळी शिक्षण, क्षमता वृद्धी, प्रशिक्षण, शहरी प्रशासन, आरोग्य, सार्वजनिक सेवा, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ विकास या क्षेत्रांत सहकार्य वाढविण्याबाबत चर्चा झाली होती. भविष्यातील सहकार्य केवळ चर्चेपुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी ठोस पावले उचलण्यावरही दोन्ही बाजूंमध्ये चर्चा झाली होती.
ओकायामा मैत्री उद्यानाचाही संदर्भ
पुणे-ओकायामा संबंधांचे प्रतीक म्हणून पुण्यातील पुणे-ओकायामा मैत्री उद्यान विकसित करण्यात आले आहे. हे उद्यान जपानी शैलीतील असून, त्याला ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे नाव देण्यात आले आहे. दोन्ही शहरांमधील सांस्कृतिक संबंधांच्या दृष्टीने या उद्यानाला महत्त्व आहे.
