Pune Police News | पुणे : इंस्टाग्रामवरील ‘नेत्याला संपवलं, लाठी काठी अन् दगडांनी केला हल्ला’ या पोस्टवर कमेंट करणं पोलिसाला महागात पडलं; तडकाफडकी निलंबन
पुणे : इंस्टाग्रामवरील पोस्टवर कमेंट करून पोलीस दलाच्या शिस्तीचे उल्लंघन करणार्या पोलीस अंमलदाराला पोलीस उपायुक्त पी आर पाटील यांनी निलंबित केले आहे. (Samadhan Gaikwad Suspended)
समाधान अभिमान गायकवाड (Samadhan Abhiman Gaikwad) असे या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. ते सध्या पोलीस मुख्यालयातील बी कंपनी येथे नियुक्तीला होते.
पोलीस अंमलदार समाधान गायकवाड यांनी सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर ‘नेत्याला संपवलं, लाठी काठी अन् दगडांनी केला हल्ला’ अशा शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीवर त्यांच्या वैयक्तिक इंस्टाग्राम आयडी वरुन अत्यंत आक्षेपार्ह, बेजाबदार स्वरुपाची टिप्पणी केली होती.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या शिस्तप्रिय पोलीस दलाचे जबाबदार घटक असूनही, समाजात हिंसाचाराचे व कायद्याचे उल्लंघन करण्याचे समर्थन करणारी टिप्पणी करणे, हे शासकीय कर्मचार्यासाठी लागू असलेल्या कर्तव्यपरायणता आणि शिस्तीचे उल्लंघन करणारे आहे. या कृत्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा सामान्य जनमाणसात मलीन झाली आहे. हे बेशिस्त व नैतिक अध:पतनाचे आणि शिस्तबद्ध असलेल्या पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे अशोभनीय वर्तनाकरीता पोलीस उपायुक्त पी आर पाटील यांनी पोलीस अंमलदार समाधान गायकवाड यांना निलंबित केले आहे.
