Pune Police News | अंमली पदार्थाविरोधात पोलिसांच्या बदलेल्या कडक धोरणामुळे रेव्ह पार्टीचा प्रकार उघडकीस : पोलीस आयुक्त अमितेश कुमार
पुणे : Pune Police News | ‘ड्रग्ज फ्री पुणे’या पुणे पोलिसांनी सुरु केलेल्या मोहिमेमधील बदललेल्या धोरणाचा परिपाक म्हणून शहरातील अंमली पदार्थांच्या तस्करी व सेवनाविरुद्ध सातत्याने कारवाई होत आहे. या कडक धोरणांमुळेच तुळापूर येथील रेव्ह पार्टीचा प्रकार उघडकीस येण्यास मदत झाली, असे मत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘पोलीसनामा’शी बोलताना व्यक्त केले.
तुळापूर येथील खासगी बंगल्यात उशिरापर्यंत सुरु असलेल्या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणी सहभागी झाले होते. त्यात अंमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याचे समजल्यावर अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त गौहर हसन यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे व त्यांच्या सहकार्यांनी या पार्टीवर रविवारी पहाटे अडीच वाजता छापा घातला होता. यामध्ये ८५ लाखांचा माल जप्त केला असून ७८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, अंमली पदार्थांच्या विरोधात पुणे पोलिसांनी उघडलेल्या आघाडीतून शहरात येणार्या अंमली पदार्थांवर सध्या कडक कारवाई केली जात आहे. तरुणांना अंमली पदार्थांचे व्यसन लावणार्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्यातूनच आता याच्याशी संबंधित असलेल्यांकडून पोलिसांपर्यंत मोठ्या प्रमाणावर माहिती येत आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीवर आळा घालण्याचा पोलिसांचा प्रयत्न यापुढेही असाच राहणार आहे.
