Pune Rain News | पुण्यासह इंदापूर, बारामतीला मुसळधार पावसाने झोडपले! इंदापुरात अवघ्या 3 तासांत 131 मिमी, बारामतीत 77 मिमी तर पुण्यात 41 मिमी पावसाची नोंद

Pune Rain News | Heavy rain lashes Pune along with Indapur and Baramati! In just 3 hours, Indapur recorded 131 mm, Baramati 77 mm, and Pune 41 mm of rain.

पुणे : Pune Rain News | पुणे शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत रविवार रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः इंदापूरमध्ये सोमवारी (२ नोव्हेंबर) मध्यरात्रीनंतर अवघ्या तीन तासांत तब्बल १३१ मिमी पावसाची नोंद झाली. तर सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत बारामतीत ७७ मिमी आणि पुण्यातील शिवाजीनगर परिसरात ४१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून इंदापूरमध्ये लक्षणीय पाऊस झाला नव्हता. मात्र, सोमवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. अवघ्या अर्ध्या तासात २७ मिमी पाऊस कोसळला. त्यानंतर रात्री एक वाजेपर्यंत ४३ मिमी, सव्वाएक वाजेपर्यंत ७२ मिमी, दीड वाजेपर्यंत ९० मिमी, तर दोन वाजेपर्यंत १०७ मिमी पावसाची नोंद झाली. पहाटे तीन वाजेपर्यंत पावसाचा एकूण आकडा १३१ मिमीवर पोहोचला. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला.

पुणे जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

इंदापूर आणि बारामतीसह जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. आंबेगावमध्ये ५० मिमी, ढमढेरे आणि शिरूरमध्ये प्रत्येकी ३९ मिमी, हडपसर आणि हवेलीमध्ये प्रत्येकी ३५ मिमी, मगरपट्ट्यात ३० मिमी, चिंचवडमध्ये २० मिमी, भोरमध्ये १७ मिमी, पाषाणमध्ये १५ मिमी, तर तळेगावमध्ये १४ मिमी पावसाची नोंद झाली. एनडीए आणि पुरंदरमध्ये प्रत्येकी ५ मिमी, तर दौंडमध्ये २ मिमी पाऊस नोंदवण्यात आला.

पुणे शहरातील अनेक भागांत पावसाची जोरदार हजेरी

रविवारी रात्रीपासून पुणे शहरातील बहुतांश भागांत पावसाने जोर धरला. औंध, पुणे महापालिका परिसर, मंडई, भवानी पेठ, कसबा पेठ, मध्यवर्ती पेठांसह विविध उपनगरांमध्ये चांगला पाऊस झाला.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कामावर जाणाऱ्या नोकरदारांची आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक दिवसांपासून घरात ठेवलेले रेनकोट आणि छत्र्या पुन्हा बाहेर काढण्याची वेळ पुणेकरांवर आली.

नोव्हेंबरमध्ये पावसाची हजेरी; उकाड्यापासून पुणेकरांना दिलासा

नोव्हेंबर महिना सुरू झाल्यानंतरही पुणेकरांना ऑक्टोबरसारख्या उकाड्याचा सामना करावा लागत होता. मात्र, अचानक झालेल्या या दमदार पावसामुळे शहरातील वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

You may have missed