Pune Crime News | पुणे : कोथरूड ते नवी मुंबई थरारक पाठलाग! 7 लाखांच्या कर्जाच्या वादातून व्यावसायिकाचे अपहरण; अलंकार पोलिसांनी केली सुखरूप सुटका
पुणे : Pune Crime News | सात लाख रुपयांच्या कर्जाच्या वादातून एका ४३ वर्षीय व्यावसायिकाचे चार जणांनी स्कॉर्पिओ गाडीतून अपहरण केल्याची धक्कादायक घटना कोथरूड परिसरात घडली. मात्र, अलंकार पोलिसांनी प्रसंगावधान राखत कोथरूड ते नवी मुंबई असा थरारक पाठलाग करून अपहृत व्यावसायिकाची सुखरूप सुटका केली. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याचे तीन साथीदार फरार झाले आहेत.
केदार जयंत वांगीकर (वय ४३, रा. वारजे माळवाडी, पुणे) असे अपहरण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. तर समीर गुलाब शेख (Sameer Gulab Shaikh) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
स्कॉर्पिओमध्ये जबरदस्तीने बसवून अपहरण
२८ ऑक्टोबर २०२६ रोजी कोथरूड येथील दिपाश्री बंगल्याजवळ चार अनोळखी व्यक्तींनी वांगीकर यांना धक्काबुक्की करत स्कॉर्पिओ गाडीत जबरदस्तीने बसवून नेले. याबाबत त्यांचे मित्र विनय प्रकाश पावटेकर यांनी पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच अलंकार पोलीस ठाण्याचे मार्शल कर्तव्यावरील पोलीस कर्मचारी चव्हाण आणि लोंढे यांनी तत्काळ वाहनाचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पोलीस पथकही आरोपींच्या मागावर रवाना झाले.
टोलनाक्याचा अडथळा तोडून आरोपींचा पळण्याचा प्रयत्न
आरोपींची स्कॉर्पिओ कर्वे रोड, चांदणी चौकमार्गे मुंबईच्या दिशेने जात असल्याचे समजताच पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, रायगड, नवी मुंबई आणि महामार्ग पोलिसांना सतर्क करण्यात आले.
खालापूर परिसरात संशयित स्कॉर्पिओ दिसताच पोलिसांनी पाठलाग सुरू केला. आरोपींनी पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत टोलनाक्याचा अडथळा तोडून भरधाव वेगाने मुंबईच्या दिशेने पलायन केले.
मात्र, पोलिसांनी पाठलाग सुरूच ठेवला. अखेर पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील पनवेल एक्झिटजवळ वाहतूक रोखून संशयित वाहनाची कोंडी करण्यात आली. पोलिसांनी पुढून आणि मागून घेराव घालत स्कॉर्पिओ अडवली. यावेळी एका आरोपीला ताब्यात घेऊन वांगीकर यांची सुखरूप सुटका करण्यात आली. अन्य तीन आरोपी महामार्गावरच वाहनातून उतरून पसार झाल्याची माहिती अटक आरोपीने पोलिसांना दिली.
७ लाख रुपयांच्या कर्जाच्या वादातून अपहरण
पोलिसांच्या तपासात अपहरणामागील कारण समोर आले आहे. वांगीकर यांनी त्यांच्या ओळखीच्या दोन मित्रांना आरोपीकडून सात लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्यासाठी मध्यस्थी केली होती. मात्र, संबंधितांनी वेळेत कर्जाची परतफेड केली नाही. याच वादातून आरोपी समीर गुलाब शेख याने वांगीकर यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांचे अपहरण केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.
याप्रकरणी वांगीकर यांच्या फिर्यादीवरून अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली असून, आरोपीला न्यायालयाने ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. फरार तीन आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल माने करत आहेत.
सदरची कामगिरी सागर कवडे, सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शना खाली अलंकार पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सपोफौज तळोले, पो.हवा. शेळके, पो.हवा. यादव, पो. हवा. सोनवणे, पो.शि. गोणारकर, पो.शि. विशाल मोरे, पो.शि. लोंढे, पो.शि. चव्हाण यांनी कौशल्याने तपास केला आहे.
