Pune-Solapur Highway Accident | पुणे : पोलीस ठाण्यातून बाहेर पडून रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाची धडक; सहाय्यक फौजदाराचा मृत्यू
पुणे : Pune-Solapur Highway Accident | पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत उरुळी कांचन पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक फौजदाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 18) रात्री सव्वाबाराच्या सुमारास घडली.
गणेश दाभाडे (वय 49, मूळ रा. सिंदखेडा, जि. धुळे) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दाभाडे हे पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर श्रीकृष्ण मंगल कार्यालय आणि ग्रीन पार्क हॉटेलजवळ पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडत होते. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.
अपघातात दाभाडे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
गणेश दाभाडे हे 2001 मध्ये पोलीस दलात भरती झाले होते. ते तेव्हापासून पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होते. त्यांनी पौड, वेल्हे, जेजुरी आणि सासवड पोलीस ठाण्यांत सेवा बजावली होती. सध्या ते उरुळी कांचन पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत होते.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच उरुळी कांचन पोलीस ठाण्यात शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव मूळ गावी पाठविण्यात येत असून शासकीय इतमामात मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. पोलीस संबंधित वाहन आणि चालकाचा शोध घेत आहेत.
