Pune TET Paper Leak Case | पुणे टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मोकाट ! तपास झाला अर्धवट, अनेक प्रमुख आरोपी अजूनही वाँटेड, खटल्यांची नुसतीच तारीख पे तारीख

Pune TET Paper Leak Case | Accused in Pune TET Paper Leak Case Free! Investigation is incomplete, many key accused are still wanted, cases are just a matter of date and date

पुणे : Pune TET Paper Leak Case | संपूर्ण राज्यात गाजलेल्या पुणे टीईटी पेपर फुटीमध्ये हजारो अपात्र शिक्षकांकडून पैसे घेऊन त्यांचे गुण वाढवून तसेच नापास झालेल्यांना पास करुन कोट्यावधींच्या गैरव्यवहार प्रकरणात अनेक प्रमुख आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत. आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर शासकीय अधिकारी यामध्ये अडकलेले असल्याने याचा तपास अर्धवट राहिला आहे. एकट्या टीईटी घोटाळ्यात किमान १६ प्रमुख आरोपी वाँटेड आहेत. आरोग्य विभागातील दोन पेपरफुटी व म्हाडाच्या पेपरफुटीमधील तपासही असाच अधांतरी आहे. यातील अटक केलेल्या प्रमुख आरोपींना जामीन मिळाल्यानंतर वाँटेड आरोपींचा शोध थांबला. सध्या कोर्टात नुसत्या तारीख पे तारीख सुरु आहे. टीईटीच्या खटल्यामध्ये यापुढील सुनावणी १५ मे २०२६ रोजी आहे. परंतु, आजही या खटल्याची पुढील तारीख दिली जाणार असल्याचे निश्चित आहे.

नीट परीक्षेचे पेपर फुटीचे प्रकरण सध्या देशभर गाजत आहे. त्यामुळे या पूर्वी टीईटी, आरोग्य विभागाचे पेपर, म्हाडाचे पेपर फुटीचे राज्यभरात गाजलेले प्रकरण सध्या अडगळीत पडल्याचे दिसून आले.

पुणे शहर पोलीस दलातील सायबर पोलिसांनी आरोग्य विभागाच्या गट क व गट ड या दोन पेपर फोडणार्‍या काही जणांना पकडले. त्यातून या प्रकरणाची सुरुवात झाली होती. सायबर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस हाके व त्यांच्या सहकार्‍यांनी आरोग्य विभागापाठोपाठ टीईटी आणि म्हाडा पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आणला होता. आरोग्य विभागाच्या पेपर फोडण्यामध्ये आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली होती. म्हाडाची परीक्षा होती, त्याच्या आदल्या रात्री पेपर फोडणार्‍यांना पकडण्यात आले. त्यात परीक्षेचे संचालन करणारे जी ए सॉफ्टवेअर या कंपनीचे संचालक प्रीतिश दिलीपराव देशमुख याला पकडण्यात आले होते. त्याशिवाय हा फुटलेला पेपर परिक्षांर्थीपर्यंत पोहचविणार्‍या एजंटाना अटक केली होती.

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी)मध्ये अपात्र परिक्षार्थीचे गुण वाढविणे, नापात्र परिक्षार्थीचे गुणपत्रक बदलून त्यांना पास करणे यासाठी पैसे घेण्यात आले होते. १५ जुलै २०१८ मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल ऑक्टोंबर २०१८ मध्ये लागला. जी ए सॉफ्टवेअर या परीक्षा आयोजनाचे कंत्राट असलेल्या कंपनीचे मॅनेजर अश्विनकमार याने तत्कालीन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे, तुकाराम नामदेव सुपे व शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्या मदतीने या परीक्षा परिषदेच्या संकेत स्थळावर अपात्र असलेल्या १ हजार ७०१ परीक्षार्थीकडून ५ कोटी ३७ लाख रुपये एजंटामार्फत गोळा केले होते. त्यातील जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक गणेशन कलीयन याला २ कोटी रुपये मिळाले होते. सुखदेव ढेरे याला २० लाख रुपये, तुकाराम सुपे याला ३० लाख रुपय मिळाले होते. जी ए सॉफ्टवेअर चा उपाध्यक्ष अश्विनीकुमार, संचालक प्रितिश देशमुख यांनी मोठ्या प्रमाणावर पैसे कमावले होते.

टीईटी प्रकरणात २ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात सुखदेव डेरे, तुकाराम सुपे, अश्विनकुमार शिवकुमार, सौरभ त्रिपाठी, निखिल कदम, अभिषेक सावरीकर, एजंट संतोष हरकळ, अंकुश हरकळ, प्रितीश देशमुख अशा १२ जणांना अटक केली होती. ज्या सर्वाधिक २ कोटी रुपये मिळाले तो जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा अध्यक्ष गणेशन कलीयन याच्यासह १६ जणांना वाँटेड म्हटले आहे. या टीईटी घोटाळ्यात शिक्षण विभागाचे उपसचिव सुशील खोडवेकर यालाही अटक केली होती. २०१९ -२० मध्ये घेतलेल्या टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींना पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. या गुन्ह्यांमध्ये चार्जशिट दाखल झाल्यानंतर संबंधित पोलीस अधिकारी यांच्या बदल्या झाल्या. त्यानंतर वाँटेड आरोपींचा शोध थांबला. आज कोर्टात केवळ तारीख पडत आहे.

या गुन्ह्यातील आरोपी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. सुपे यांनी ३ कोटी ५९ लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यांना २४ मे व ३० मे २०२२ रोजी दोन्ही गुन्ह्यात जामीन मिळाल्याने ते कारागृहातून बाहेर आले. त्यानंतर या खटल्यात पुढे काहीही झाले नाही.

अ‍ॅड. मिलिंद पवार यांनी सांगितले की, टीईटी खटल्यामध्ये सर्व आरोपी जामीनावर बाहेर आले आहे. पोलिसांनी जप्त केलेले सोने व इतर वस्तू आरोपींना परत मिळाल्या आहेत. पाहिजे असलेले आरोपीविषयी तपास थंडावला आहे. या खटल्यांमध्ये आता केवळ दर महिन्यांना पुढील तारीख पडते. या तारखांनाही बरेचसे आरोपी आता तारखांना न्यायालयात येत पण नाहीत. फक्त सुपे व एक दोन आरोपी येतात. थोडक्यात ही केस अडगळीत पडली आहे.

सध्या गाजत असलेले नीट परीक्षा पेपरफुटीमध्ये बड्या व्यक्ती सापडल्यानंतर हे ही प्रकरण टीईटीप्रमाणे अडगळीत पडू नये. नाही तर तरुणांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह कायम राहील.

You may have missed