Redevelopment In Kothrud | पुणे: पुनर्विकास क्षेत्रातही कोथरूडची आघाडी; जिल्ह्यातील जवळपास 40 टक्के प्रकल्प याच भागात

Redevelopment in Kothrud | Pune: Kothrud leads in redevelopment; nearly 40 percent of the district's projects are in this area.

पुणे : Redevelopment In Kothrud | शहरातील जुन्या आणि विकसित उपनगरांपैकी एक असलेल्या कोथरूडने पुनर्विकास क्षेत्रातही आघाडी घेतली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या 629 पुनर्विकास प्रकल्पांपैकी जवळपास 40 टक्के प्रकल्प कोथरूडमध्ये सुरू असल्याचे समोर आले आहे.

‘महारेरा’च्या सार्वजनिक आकडेवारीवर आधारित ‘द रिडेव्हलपमेंट पल्स’ या विश्लेषणात्मक अहवालानुसार, कोथरूडमध्ये एकूण 410 नोंदणीकृत बांधकाम प्रकल्प असून त्यापैकी 244 प्रकल्प पुनर्विकासाशी संबंधित आहेत. म्हणजेच कोथरूडमधील जवळपास 60 टक्के नोंदणीकृत प्रकल्प पुनर्विकासाचे आहेत.

‘ड्रीम्स रिडेव्हलप्ड’ या सल्लागार संस्थेने पुणे जिल्ह्यातील ‘महारेरा’वर नोंदणीकृत 4,823 प्रकल्पांचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. यासाठी 19 सप्टेंबर 2026 पर्यंतच्या सार्वजनिक नोंदींचा आधार घेण्यात आला.

अहवालानुसार, कोथरूडसह एरंडवणे-डेक्कन, पर्वती-सहकारनगर, पिंपरी-चिंचवड, गुलटेकडी-बिबवेवाडी आणि शिवाजीनगर हेही पुनर्विकासाचे प्रमुख भाग म्हणून पुढे आले आहेत.

पुनर्विकासाचा निर्णय घेण्यापूर्वी गृहनिर्माण संस्थांनी विकासकाचा अनुभव, यापूर्वी पूर्ण केलेले प्रकल्प, मुदतवाढीचा इतिहास आणि वैधानिक माहिती सविस्तर तपासावी, असा सल्लाही अहवालातून देण्यात आला आहे.

महत्त्वाची आकडेवारी: पुणे जिल्ह्यातील पुनर्विकास प्रकल्प – 629 | कोथरूडमधील नोंदणीकृत प्रकल्प – 410 | कोथरूडमधील पुनर्विकास प्रकल्प – 244

You may have missed