Wakad Pune Crime News | कंपनीत डायरेक्टर करण्याचे आमिष दाखवुन 11 कोटींना गंडा घालणार्‍या सचिन साळुंखे आणि श्वेता साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल

Wakad, Pune Crime News | Case registered against Sachin Salunkhe and Shweta Salunkhe, owners of 'Cafe Peter', for allegedly swindling ₹11 crore by luring a person with the promise of a company directorship.

पुणे : Wakad Pune Crime News |  कंपनीत डायरेक्टर करतो, असे आमिष दाखवुन गुंतवणुकदारांना ११ कोटी ६७ लाख रुपयांना गंडा घालणार्‍या  सचिन चंद्रकांत साळुंखे आणि श्वेता सचिन साळुंखे यांच्यावर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सचिन चंद्रकांत साळुंखे Sachin Chandrakant Salunkhe (वय ३७), श्वेता सचिन साळुंखे Shweta Sachin Salunkhe (वय ३५, दोघे रा. ओपुला, न्यू डी पी रोड, पिंपळे निलख, विशालनगर) असे या आरोपींचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार झाले आहेत.

याबाबत दीपक दत्तात्रय बर्गे (वय ४०, रा. फॉरेस्ट ट्रेल टाऊनशिप, भूगाव) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार वाकड येथील व्हाईट स्क्वेअर येथील कार्यालयात २२ मे २०२२ ते आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची व्यावसायिक कारणावरुन आरोपीची ओळख झाली. सचिन साळुंखे यांनी कॅफे पीटर कॅफे प्रमाणे नवीन कॉफी ब्रँड तयार करत आहे. त्या कंपनीत तुम्हाला डायरेक्टर करतो, असे फिर्यादी यांना आमिष दाखवले. तुम्ही ग्लोकल फुड वर्क्स  प्रा. लि., (Glocal Foodworks Pvt. Ltd)  ब्लॅकहॅट सिंडिकस प्रा. लि., (Blackhat Syndicus Pvt. Ltd) सुपर गॅलेक्सी स्पोर्टस प्रा. लि़. ( Super Galaxy Sports Pvt. Ltd), ओटोमॅक्स टेक सर्व्ह प्रा. लि. (Otomax tech serve Pvt Ltd) या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली तर कंपनीत डायरेक्टर करुन इक्विटी शेअर देईन आणि चांगला परतावा देईन, असे आश्वासन दिले.

या कंपन्या सचिन साळुंखे याने २०१६ ते २०२१ दरम्यान स्थापन केल्या आहे. त्याचे ते चेअरमन आहेत. त्यामुळे फिर्यादी यांनी सचिन साळुंखे याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून १० कोटी २ लाख ७ हजार रुपये वेळोवेळी गुंतवणूक केली़ तसेच संदीप मोहन कुलकर्णी यांनी ४० लाख रुपये व जॉयदिप डे यांनी १ कोटी २५  लाख रुपये अशी एकूण ११ कोटी ६७ लाख ७ हजार रुपयांची या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. गुंतवणूक केल्यानंतर सचिन साळुंखे याने त्यांना काही काळाने डायरेक्टर केले. त्यांनी इक्विटी शेअरची मागणी केल्यावर ते नंतर देतो, असे सांगितले. त्यानंतरही त्यांनी वेळोवेळी मागणी केल्यानंतर त्यांना इक्विटी शेअर दिले नाहीत. तसेच परतावाही दिला नाही. तसेच कंपनीच्या आर्थिक व्यवहारासंदर्भात सचिन साळुंखे याला दिलेल्या सहीच्या अधिकाराचा गैरवापर करुन त्याने कंपनीतील काही रक्कमा स्वत:च्या बँक खात्यावर घेतल्या़ कंपनीतील गुंतवणूक रक्कमेचा त्याने अपहार केला.

यादरम्यान, दिल्ली येथे फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर फिर्यादी यांनी आपले पैसे परत देण्याची मागणी केली. तेव्हा सचिन साळुंखे याने तुम्ही डायरेक्टरपदाचा राजीनामा द्या, मी तुमचे पैसे परत करतो, असे सांगितले. त्यानुसार त्यांनी कंपनीच्या डायरेक्टरपदाचा राजीनामा दिला. त्यानंतरही सचिन साळुंखे याने त्यांनी गुंतवणूकीवर कोणताही परतावा दिला नाही. तसेच मुळ रक्कमही परत केली नाही. सातत्याने मागणी करुनही त्याने पैसे परत न केल्याने शेवटी त्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिला होता.

त्या अर्जाची चौकशी केल्यानंतर वाकड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे तपास करीत आहेत.

You may have missed