Pune Crime News | धक्का लागल्याने तरुणाच्या डोक्यात फरशी मारुन केले गंभीर जखमी; किनारा हॉटेलबाहेर हल्ला करणाऱ्या बालगुन्हेगाराची रिमांड होममध्ये रवानगी

Pune Crime News | Cab driver injured by throwing beer bottle at his head on suspicion of knowing about missing man's wife

पुणे : Pune Crime News | हॉटेलमधून दारु पिऊन बाहेर पडताना धक्का लागल्याने झालेल्या बाचाबाचीत अल्पवयीन गुन्हेगाराने तरुणाच्या डोक्यात दगड घालून खाली पाडले. त्यानंतर फरशीचा तुकडा डोक्यात मारुन गंभीर जखमी केलेल्या अल्पवयीन गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले.

निलेश दिगंबर जाधव (रा. कात्रज) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ महेश दिगंबर जाधव (वय ३९, रा. खिवंसरा चाळ, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना कात्रज येथील पुणे सातारा रोडवरील किनारा हॉटेलच्या बाहेर ५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ निलेश जाधव व कुणाल शिवाजी भालके हे किनार हॉटेलमध्ये दारु पिण्यास गेले होते. दारू पिऊन बाहेर आल्यानंतर निलेश जाधव याचा धक्का बाब्या याला लागला. त्यावरुन त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी बाब्याने निलेश याच्या डोक्यात दगड मारुन जखमी केले. निलेश जाधव हा खाली पडला असताना त्याने निलेश याच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारुन त्याला गंभीर जखमी केले. हे समजताच महेश जाधव यांनी आपल्या जखमी भावाला भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.

सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे यांनी सांगितले की, आरोपी अल्पवयीन असून त्याच्यावर यापूर्वी २ ते ३ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन रिमांड होममध्ये त्याला ठेवण्यात आले आहे.

You may have missed