Pune Crime News | क्रुड ऑईल खरेदीत नफा मिळवून देण्याच्या आमिषाने अडीच कोटींची फसवणूक; दुबईत वास्तव्य करणार्यांसह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | क्रुड ऑईल खरेदीत नफा मिळवून देण्याच्या आमिषाने एका महिलेची २ कोटी ५४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. बाणेर पोलिसांनी दुबईत राहणार्या आरोपींसह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात ५ महिलांचा समावेश आहे़. अशा फसवणुकीच्या गुन्ह्यात एकाच वेळी इतक्या महिलांचा समावेश असल्याची पहिलीच वेळ आहे.
याबाबत सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील एका ३६ वर्षाच्या महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पूनम विशाल शेळके, विनायक महादेव शेळके, सुरेखा महादेव शेळके (तिघे रा. दुबई), वैशाली हनुमंत फडतरे (वय ४९, रा. विनायक अपार्टमेंट, आंबेगाव बुद्रुक), हनुमंत लक्ष्मण फडतरे, रितिका हनुमंत फडतरे, ऐश्वर्या ओंकार लोंढे, तसेच अल्फा माईंड सोल्यूशन्स, इन्फोसेस सोल्यूशन्स या कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बाणेरमधील पॅनकार्ड रोडवरील सुप्रिम इस्ता येथील फ्लॅटमध्ये १८ ऑगस्ट २०२४ ते आतापर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील राहणार्या आहेत. दोन वर्षांपूर्वी आरोपींशी त्यांची ओळख झाली होत़ी. बाणेर भागातील कार्यालयात आरोपींनी महिलेला बोलावून घेतले. आमच्या दोन, तीन कंपन्या आहेत. आमचा क्रुड ऑईलचा व्यवसाय आहे. क्रुड ऑईल खरेदी विक्रीत पैसे गुंतविल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी महिलेला दाखविले. पूनम शेळके, विनायक शेळके, सुरेखा शेळके हे दुबईत कंपनीचे काम पहातात, असे भासविले. महिलेला जाळ्यात ओढून आरोपींनी तिच्याकडून वेळोवेळी २ कोटी ५४ लाख ८४ हजार रुपये घेतले. गुंतवणूक केल्यानंतर महिलेला आरोपींनी कोणताही परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने आता पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) अलका सरग तपास करीत आहेत.
