Pune Crime Court News | पोस्को प्रकरणातील चार आरोपींना जामीन मंजूर
पुणे : Pune Crime Court News | विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेल्या पोस्को कायद्यांतर्गत गुन्ह्यातील चार आरोपींना मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. वाय. थत्ते साहेब यांनी जामीन मंजूर केला आहे.
सदर प्रकरणात फिर्यादी यांनी तिची आई, मावशी तसेच त्यांच्या दोन सहकाऱ्यांविरुद्ध लैंगिक छळ, अश्लील कृत्ये, जबरदस्तीने विवाह लावून देण्याचा प्रयत्न आदी आरोपांवरून विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित चारही आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले होते. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
त्यानंतर आरोपींच्या वतीने ॲड. राकेश सोनार (Adv. Rakesh Sonar) यांनी मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने अर्जास विरोध दर्शविला. मात्र, ॲड. राकेश सोनार यांनी आरोपींची बाजू प्रभावीपणे मांडताना न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, सदर प्रकरण हे कौटुंबिक वादातून उद्भवलेले असून कथित घटना घडल्याची तारीख व गुन्हा दाखल झाल्याची तारीख यामध्ये लक्षणीय तफावत आहे. तसेच प्रथमदर्शनी उपलब्ध नोंदींवरून आरोपींविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा संशय निर्माण होतो.
याशिवाय फिर्यादी व तिच्या वडिलांचा सदर गुन्हा दाखल करण्यामागील हेतू वेगळा असून पोस्को कायद्याचा गैरवापर करण्यात आल्याचे मुद्देही न्यायालयासमोर मांडण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मा. न्यायालयाने प्रकरणातील परिस्थिती विचारात घेऊन चारही आरोपींना प्रत्येकी रु. २५,०००/- च्या पी.आर. बाँड व योग्य जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
सदर प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. राकेश सोनार यांनी कामकाज पाहिले व ॲड. अविनाश खुडे, ॲड. ओंकार औसेकर, प्रशांत पोतदार, प्रतीक भेगडे पाटील, अनिरुद्ध पाऊल, अदिती वाघमारे यांनी सहकार्य केले..
