Pune Crime News | LIC च्या नावाने डेली कलेक्शनच्या नावाखाली छोट्या व्यवसायिकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या भामट्याला विमानतळ पोलिसांनी केली अटक
पुणे : Pune Crime News | विमाननगर परिसरातील छोटे व्यवसायिकांकडून एलआयसीच्या नावाने डेली कनेक्शनच्या नावाखाली गेली काही वर्षे दररोज पैसे घेऊन लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्यांनी पैसे गुंतवले होते, त्या व्यावसायिकांनी त्याला पकडून विमानतळ पोलिसांसमोर हजर केले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
लक्ष्मण रावसाहेब चोपडे Laxman Raosaheb Chopde (वय ३८, रा. गावठाण, मु. औरंगपूर, पो. निमगाव जाळी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) असे या भामट्याचे नाव आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याची ३ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. याबाबत नागनाथ केरबा बासे (वय ५२, रा. शंकरनगर, खराडी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०२३ ते २०२५ पर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागनाथ बासे हे विमान नगर मधील दत्त मंदिर चौकात नारळ पाणी विक्रीचा व्यवसाय करतात. लक्ष्मण चोपडे याने एलआयसीमध्ये पैसे गुंतवतो, असे सांगून तो दररोज डेली कलेक्शन म्हणून ३२० रुपये भरणा करण्यासाठी घेऊन जात असे. त्यांना त्याचे पुस्तकही दिली होते. २०२५ मध्ये ते विमाननगर येथील एल आय सी कार्यालयात पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना तेथील लोकांनी २०२३ पासून तुमचे अकाऊंट बंद असून त्यामध्ये पैसे टाकण्यात आलेले नाही, असे सांगितले. त्यांनी लक्ष्मण चोपडे याला फोन करुन विचारले. तेव्हा त्याने मी तुमचे पैसे एका हॉटेल व्यवसायामध्ये गुंतवले आहेत. मी तुमचे पैसे थोड्या दिवसात परत करेन, असे सांगितले. त्यावर त्यांनी विश्वास ठेवला.
त्यानंतर त्यांनी चोपडे याला वारंवार कॉल केला, परंतु, त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे ते त्याचे चंदननगर येथील कार्यालयात गेले. तेव्हा त्यांच्याप्रमाणेच त्याने आणखी काही जणांना फसवले असून ते त्यांचा शोध घेण्यासाठी आले होते. गफार मेहबुब शेख (वय ५५, रा. विमानदर्शन, संजय पार्क, विमाननगर) यांची ३० लाख रुपये आणि सुनिल नामदेव शिंदे (वय ४०, रा. गावडे वस्ती, वाडेबोलाई, ता. हवेली) यांची १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आणखीही काही जणांची लक्ष्मण चोपडे याने फसवणूक केली आहे. हे सर्व जण त्याचा शोध घेत असताना तो चंदन नगर मध्ये त्यांना दिसला. त्यांनी त्याला पकडून विमाननगर पोलिसांच्या हवाली केला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी ३ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
लक्ष्मण चोपडे याने नेमकी कोठे गुंतवणूक करण्यासाठी या लोकांकडून पैसे घेतले, याचा तपास करायचा आहे. फसवणूक झालेले आतापर्यंत तिघे जण समोर आले असून त्यांची ४३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. त्याने आणखी काही जणांची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे, असे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हर्षल घोगरे यांनी सांगितले.
