Pune Crime News | आठव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; वारजे मधील आदित्य गार्डन सिटीमधील घटनेत ठेकेदारावर गुन्हा दाखल

Crime

पुणे : Pune Crime News |  रंगाचे काम करण्यासाठी बांबू बांधण्याचे काम करत असताना आठव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाला. कामगारांना सुरक्षा पुरविण्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल वारजे माळवाडी पोलिसांनी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ज्योति सुरेशसाह बंजारिया (वय ३०, रा. गोपालगंज, बिहार) असे मृत्यु पावलेल्या कामगाराचे नाव आहे. हेमंत नागेश चव्हाण Hemant Nagesh Chavan (वय ४५, रा. आनंद पार्क, शिवशक्ती नगर, वडगाव शेरी) असे गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. याबाबत पोलिस अंमलदार विक्रम केशव खिलारी (वय ३३) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठेकेदार हेमंत चव्हाण हे वारजे परिसरातील आदित्य गार्डन सिटीच्या फेज ३ मधील आय नावाच्या इमारतीखाली बांधकामाचे रंगकामाकरीता बांबु बांधण्याचे काम करवुन घेत होते. गुरुवारी १८ जून रोजी हे काम सुरु होते. कामगारांना हेल्मेट, सुरक्षित जाळी, सेफ्टी बेल्ट इत्यादी योग्य साधनसामुग्री सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरविणे आवश्यक होते. परंतु, ठेकेदाराने ती पुरविली नाही.

सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास बांबुचा सांगाडा उभारत असताना ज्योति बंजारिया याचा तोल गेला व तो आठव्या मजल्यावरुन खाली पडला. उंच इमारतीवर काम सुरु असताना सेफ्टी नेट लावणे आवश्यक होते. सेफ्टी बेल्टही लावला नसल्याने ज्योति बंजारिया हा थेट खाली जमिनीवर पडून गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेण्यापूर्वी त्याचा मृत्यु झाला. सुरक्षेची साधने न पुरविल्याने निष्काळजीपणा केल्याने वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर रायगोंडा तपास करीत आहेत.

You may have missed