Pune Crime News | पोलिसांनी परवानगी नाकारली असताना इतिहास तज्ञ डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे शिव व्याख्यान करणार्‍या सह्याद्री युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष दादाश्री शशिकांत कामठे यांच्यावर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  पोलिसांनी परवानगी दिली नसताना शिवजयंतीनिमित्त इतिहास तज्ञ डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे शिवव्याख्यान कार्यक्रम केल्याने कोंढवा पोलिसांनी सह्याद्री युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष दादाश्री शशिकांत कामठे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

शिव जयंती निमित्त देशभर विविध कार्यक्रम होत असताना केवळ कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी गोपनीय माहितीवरुन कोंढवा पोलिसांनी या शिवव्याख्यानाला परवानगी नाकारली होती.

याबाबत पोलीस हवालदार चंद्रकांत शिवाजी मिसाळ यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत मिसाळ हे येवलेवाडी पोलीस ठाण्यात एल आय बी विभागात पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर भोसले यांच्यासह कर्तव्य करीत आहेत. या विभागात गोपनीय माहिती प्राप्त करुन त्या अनुषंगाने वरिष्ठांना अवगत करुन कारवाई करण्याचे काम केले जाते.

१९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंती निमित्त सह्याद्री युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दादाश्री शशिकांत कामठे यांनी शत्रुंजय गंगाधाम रोड येथील साळवे गार्डन येथे प्रसिद्ध इतिहास तज्ञ डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे शिव व्याख्यान सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत आयोजित केले होते. या कार्यक्रमाकरीता परवानगी मिळावी म्हणून लेखी पत्र १८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दिले होते. परंतु, प्रसिद्ध इतिहास तज्ञ डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यान कार्यक्रम झाल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी गोपनीय व खात्रीलायक माहिती मिळाल्याने हा व्याख्यान कार्यक्रम रद्द करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यांना या कार्यक्रमासाठी कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल म्हणून परवानगी देण्यात आलेली नव्हती.

कार्यक्रमासाठी परवानगी न देताही दादाश्री कामठे हे त्यांचा कार्यक्रम करण्यावर ठाम असल्याने व त्यांनी नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्यक्रमाची तयारी केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना आज १९ फेब्रुवारी रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६८ प्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा, येवलेवाडी पोलीस ठाणे यांनी प्राप्त अधिकारान्वये (दखलपात्र अपराधांना प्रतिबंध करण्याच्या उपाय योजनांच्या अनुषंगाने या कार्यक्रमादरम्यान कोणत्याही प्रकारचे प्रक्षोभक वक्तव्ये करण्यात येऊ नये, तसेच कार्यक्रमा दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार अथवा घटना घडल्यास त्याबाबत आयोजक यांना सर्वस्वी जबाबदार धरुन पुढील कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस देण्यात आलेली होती. असे असताना दादाश्री कामठे यांना कार्यक्रमासाठी पोलीस ठाण्याकडून कोणतीही परवानगी देण्यात आली नसताना सुद्धा डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम ८० ते १०० जणांसमोर पार पाडला आहे. म्हणून दादाश्री कामठे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ प्रमाणे तक्रार देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मारुती केदारी पाटील तपास करीत आहेत.

You may have missed