Pune PMC News । वर्षभरापुर्वीच शहरातील वृक्ष गणनेचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा गणनेची घाई ? वृक्षगणनेच्या प्रस्तावात असंख्य त्रुटी ठेवल्याने उद्देश गुलदस्त्यात
पुणे : Pune PMC News । महापालिकेच्या हद्दीतील वृक्षांची २०१४ मध्ये सुरू झालेली गणना नुकतेच २०२४ मध्ये संपली आहे. यानंतरही प्रशासनाने अवघ्या वर्षभरात महापालिकेच्या जुन्या हद्दीसह समाविष्ट गावांतील जनगणनेचे काम करण्यासाठी २९ कोटी ८३ लाख रुपयांची निविदा मंजुर केली आहे. विशेष असे की समाविष्ट गावांचा विकास आराखडा अद्याप झालेला नसताना वृक्षगणनेची निविदा काढण्याचा उद्देशही ‘गुलदस्त्यात’ आहे. तसेच हा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवताना उद्यान विभागाने अनेक त्रुटी ठेवल्याने ही निविदा मान्य करण्यासाठी जाणीवपूर्वक घाईगडबड करण्यात आल्याचेही समोर आले आहे.
महापालिकेच्या सहा फेब्रुवारीच्या स्थायी समितीमध्ये समाविष्ट गावांसह संपुर्ण महापालिकेच्या हद्दीतील वृक्ष गणना जीआयएस आणि जिओे टॅगींगद्वारे करण्याची निविदा मान्य करण्यात आली. उद्यान विभागाने यासंदर्भात सादर केलेल्या प्रस्तावामध्ये ही निविदा एकाच वर्तमान पत्रात प्रसिद्ध करण्यात आल्याचा उल्लेख आहे. यासोबतच अंदाजपत्रकात केवळ साडेतीन कोटी रुपयांची तरतूद असताना सुमारे २९ कोटी ८३ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली. दोन वर्षात हे काम करण्याचा उल्लेख असताना या प्रस्तावाला पुढीलवर्षीच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यासाठी कलम ७२ ब नुसार मान्यता घेणे अपेक्षित होते. परंतू त्याचाही उल्लेख प्रस्तावात नाही. हे काम मे. सार आयटी रिर्सोसेस प्रा.लि. या कंपनीला मिळाले असून या कंपनीकडे महापालिका हद्दीतील मिळकतींच्या जिओ टॅगींग करून आणि आकारणी न झालेल्या मिळकतींचा शोध घेण्याचे काम होते. परंतू या कपंनीने चुकीच्या पद्धतीने काम केल्याने मिळकत कर विभागाने या कंपनीचे जवळपास निम्मे बिल आणि डिपॉझीटही आतापर्यंत दिलेले नाही. असे असताना प्रशासनाने आपल्या विभागांतही कंपनीच्या परफॉर्मन्सबद्दल चर्चा न करताच प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवल्याचे समोर आले आहे.
यासंदर्भात स्पष्टीकरण देताना उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले, की निविदा नियमाप्रमाणे स्थानीक , राज्य आणि देशपातळीवरील प्रत्येकी दोन अशा सहा वर्तमान पत्रांत दिली होती. परंतू नजरचुकीने प्रस्तावामध्ये एकाच वर्तमान पत्राचा उल्लेख करण्यात आला आहे. यापुर्वी २०१४ मध्ये वृक्ष जनगणनेचे काम सुरू करण्यात आले होते ते २०२४ मध्ये संपले आहे. पुर्वीच्या कामामध्ये समाविष्ट गावांतील वृक्ष गणनेचा समावेश नव्हता. परंतू रस्तारुंदीतील झाडे काढल्याबद्दल महापालिकेविरूद्ध उच्च न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यात प्रशासनाने समाविष्ट गावांतील वृक्षांची गणना करण्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. वृक्ष गणनेचे काम हे पावसाळ्याचे चार महिने वगळून फक्त आठच महिने करता येते. यानुसार जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे दोन वर्षे अर्थात प्रत्यक्षात तीन वर्षे या कामाचा अवधी राहाणार आहे. यापुर्वीचा अनुभव पाहाता हे काम आठ वर्षे सुरू राहाणार आहे. त्यामुळे ठेकेदार कंपनीला टप्प्याटप्प्याने पैसे द्यावे लागणार असून दरवर्षी अंदाजपत्रकात अर्थात सर्वसाधारण सभेमध्ये वृक्ष प्राधीकरणाच्या नियमानुसार यासाठीच्या खर्चाची मागणी करणे शक्य असल्याने ७२ ब नुसार प्रस्ताव दाखल करण्याची गरज नाही.
परंतू २०२४ मध्येच शहरातील वृक्ष गणनेचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच संपुर्ण शहरातील वृक्ष गणना करण्याचे कारण काय? समाविष्ट गावांचा विकास आराखडाच अद्याप झालेला नसताना वृक्ष गणना करण्याची घाई करण्यात आली आहे ? मे. सार आयटी या ठेकेदार कंपनीने महापालिकेमध्ये यापुर्वी केलेल्या कामाची माहिती घेतली ? याबाबत विचारणा केली असताना घोरपडे यांनी भाष्य करणे टाळले. परंतू या ठेकेदार कंपनीने मिळकत कर विभागाकडे केलेल्या कामाची माहिती घेण्यासाठी पत्र व्यवहार करण्यात येईल. त्यानंतरच वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल असे स्पष्टीकरण दिले.
